प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘मफलरमॅन’ असा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत. व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि त्यांचा मुलगा रोहित सिंग यांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आमदार सत्यजीत तांबे यांनी या वादात उडी घेत एका पोस्टद्वारे रोहित पवारांना खडे बोल सुनावले आहेत.
विनाकारण मुख्यमंत्र्यांचे नाव या अपघाताशी जोडणे हा अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी प्रकार असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, दिवंगत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्री व विश्वासाचे नाते मी जवळून पाहिले आहे. राजकारणातील अनेक चढउतारांमध्ये, प्रसंगी स्वकीयांचा विरोध पत्करूनही अजितदादांनी फडणवीसांना खंबीर साथ दिली. दिलेला शब्द पाळण्यासाठी ते नेहमीच ठाम असायचे. त्यामुळे या दुर्दैवी अपघाताला कसलाही आधार नसताना फडणवीसांशी जोडणे आणि अशा संवेदनशील घटनेचे राजकीय भांडवल करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे मत तांबे यांनी व्यक्त केले.
रोहित पवारांना सल्ला देताना तांबे म्हणाले की, तुमची ओळख एका अभ्यासू आणि तरुण आमदार म्हणून व्हायला हवी. तुमच्याकडे क्षमता आणि राजकीय महत्त्वाकांक्षा नक्कीच आहेत, पण प्रत्येक गोष्टीवर तत्काळ प्रतिक्रिया देणे किंवा संपूर्ण राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी एकट्याच्याच खांद्यावर असल्यासारख्या आविर्भावात वावरणे योग्य नाही. आपल्या सर्वांच्याच राजकारणात काही महत्त्वाकांक्षा असतात, परंतु त्या प्रवासात वैयक्तिक आणि राजकीय मर्यादा ओलांडू नयेत, याचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे, तर एकाच पिढीतील सहकारी आणि मित्र म्हणून रोहित पवारांना ‘थोडं सबुरीने घ्या’ असा सल्ला तांबे यांनी दिला आहे. राजकारणात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते, त्यामुळे अनावश्यक घाई करण्यापेक्षा सातत्य आणि अभ्यासावर भर द्यावा, असे ते म्हणाले. तसेच, केवळ एका फोटोवरून असे राजकीय निष्कर्ष काढणे आणि टीका करणे चुकीचे आहे. आजकाल समाजमाध्यमांवर अनेक नेत्यांचे त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो सहज उपलब्ध असतात. त्यामुळे निवडक फोटो समोर आणून कुणालाही लक्ष्य करणे टाळावे आणि या विषयावर अधिक भाष्य न केलेलेच बरे, असेही सत्यजीत तांबे यांनी सुनावले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; आईच्या पुस्तक प्रकाशनात सांगितला केंब्रिजमधील किस्सा
- SRA आरोपांवरून प्रताप सरनाईक यांचा संजय राऊतांवर पलटवार; अपना घर घोटाळ्याप्रकरणी दिला कारवाईचा इशारा
- अंधेरी लोकलमध्ये दोन प्रवाशांच्या वादात भिरकावलेला चाकू भलत्याच्याच छातीत घुसला, आरोपी गजाआड








