प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: पर्यटन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांच्या एसआरए प्रकल्पातील आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी राऊत सरकारविरोधात मोठे आरोप करत असून सरकारला बदनाम करण्याचा त्यांचा हा प्रयत्न अयोग्य असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ मध्ये एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) योजना सुरू केली, ज्या माध्यमातून अनेक झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे मिळाली आहेत, याची आठवण सरनाईक यांनी करून दिली. कोणताही बिल्डर स्वत:च्या फायद्यासाठी काम करत असला, तरी तो लोकांच्या घरांसाठीही कार्य करतो. त्यामुळे केवळ बिल्डरचे नाव घेऊन सरकारला लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
याचबरोबर, सरनाईक यांनी मीरा-भाईंदरमधील ‘अपना घर’ प्रकल्पातील जमीन घोटाळा आणि फसवणुकीच्या प्रकारावरही कडक भूमिका घेतली. नागरिकांना चांगली घरे देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली असून मोकळ्या जागांवर आणि पार्किंगच्या जागेवर बेकायदेशीरपणे इमारती उभारल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या बेकायदेशीर बांधकामांप्रकरणी मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त पुरुषोत्तम शिंदे यांच्याकडून लेखी अहवाल मागवण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचेही सरनाईक यांनी विशेष कौतुक केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- अंधेरी लोकलमध्ये दोन प्रवाशांच्या वादात भिरकावलेला चाकू भलत्याच्याच छातीत घुसला, आरोपी गजाआड
- होर्मुज खाडीत तेल टँकरवर हल्ला; भारतात एलपीजीसह इंधनाचे दर भडकण्याची शक्यता
- सुनील तटकरेंचा विरोधकांना सूचक टोला; ‘अभिमन्यू झालो असेल तर चक्रव्यूह कसा भेदायचा, याचा विचार करेन’








