प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: ओमानजवळील होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका तेल टँकरची नौदल सुरुंगाला जोरदार धडक बसून मोठी आग लागली आहे. या स्फोटामुळे पश्चिम आशियातील तणाव अधिकच वाढला असून, याचा थेट फटका भारताला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक पातळीवर भीतीचे वातावरण आहे.
युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) या संस्थेने सोशल मीडियाद्वारे या घटनेची पुष्टी केली आहे. हल्ल्यानंतर हे जहाज थांबले असून त्याच्या इंजिन रूमला आग लागल्याचे समोर आले आहे. जहाजाचे नेमके किती नुकसान झाले याची सविस्तर माहिती अद्याप मिळाली नसली, तरी जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या २४ तासांत या भागात जहाजांवर झालेला हा अशा प्रकारचा चौथा हल्ला आहे. इराणच्या नौदलानेही एका निवेदनाद्वारे या स्फोटाला दुजोरा दिला आहे. संबंधित तेल टँकर नेव्हिगेशन प्रणाली असलेल्या एका प्रतिबंधित सागरी क्षेत्रातून जात असल्याने हा स्फोट झाल्याचा दावा इराणने केला आहे.
इराणने होर्मुज खाडीतील अनेक भागांमध्ये बॉम्बचे सुरुंग पेरले आहेत. त्यामुळे जहाजांनी केवळ त्यांच्याकडून निर्धारित केलेल्या सुरक्षित मार्गाचाच वापर करावा, अशी वारंवार सूचना देण्यात येत आहे. मात्र या वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
इराणने होर्मुज खाडी बंद केल्याने भारतात आधीच एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. खाडीतील हा संघर्ष आणि तणाव असाच कायम राहिल्यास, आगामी काळात भारतात एलपीजी गॅससह कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुनील तटकरेंचा विरोधकांना सूचक टोला; ‘अभिमन्यू झालो असेल तर चक्रव्यूह कसा भेदायचा, याचा विचार करेन’
- गिरीश महाजनांसमोर गुलाबराव पाटलांची फटकेबाजी; ‘संकटमोचक आणि लफडेबाज माणूस’ म्हणत लगावला टोला
- सुकन्या समृद्धी योजना: मुलीच्या खात्यात दरमहा केवळ २ हजार रुपये भरा, मिळतील ११ लाख रुपये








