प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: जळगाव येथे महाराष्ट्र केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या सत्कार सोहळ्यात शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांना भाषणातून चांगलेच डिवचले. यावेळी पाटलांनी महाजनांचा ‘संकटमोचक आणि लय लफडेबाज माणूस’ असा उल्लेख करत जोरदार फटकेबाजी केली.
भाषणाच्या सुरुवातीला गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख आपले ज्येष्ठ बंधू असा केला. ‘महाजनांचे वय ६७ असून माझे वय ६० आहे,’ असे ते म्हणाले. राजकारणात रुग्णसेवेचे काम सर्वाधिक समाधान देते असे सांगून, एफडीएच्या कारवाईवर टीका करताना ‘त्रास देणाऱ्याला त्रास देणारे आम्ही आहोत,’ असा इशाराही त्यांनी दिला.
राजकारण्यांच्या आरोग्याविषयी बोलताना पाटील म्हणाले की, आमच्याकडे घरगुती वाद असलेल्या महिलांसह अनेक प्रकारचे लोक येतात, त्यामुळे आमचे काम जनरल फिजिशियनसारखे झाले आहे. विधानसभेतील २८८ पैकी २६५ आमदारांना बीपी आणि शुगरचा त्रास असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःलाही हा त्रास असल्याचे सांगत, गिरीश महाजन कार्यक्रमाला तब्बल एक तास उशिरा आल्याने ‘मी १२ वाजेपासून उपाशी असून महाजनांची वाट पाहत बसलो,’ असा टोला त्यांनी लगावला.
जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकारणावरूनही गुलाबराव पाटलांनी महाजनांवर निशाणा साधला. या निवडणुकीत गुलाबराव पाटील आणि त्यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांनी माघार घ्यावी, अशी सूचना करत पाटलांनी गिरीश महाजनांना उद्देशून ‘ते संकटमोचक आहेत, लय लफडेबाज माणूस आहे,’ अशी टिप्पणी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुकन्या समृद्धी योजना: मुलीच्या खात्यात दरमहा केवळ २ हजार रुपये भरा, मिळतील ११ लाख रुपये
- आयपीएल २०२७: यशस्वी जयस्वाल राजस्थानमध्ये नाराज? लखनौ किंवा केकेआरची कॅप्टन्सी मिळण्याची शक्यता
- सनी देओलच्या ‘सूर्या’ चित्रपटाच्या अडचणीत वाढ; राजस्थान उच्च न्यायालयाची केंद्र, सेन्सॉर बोर्डाला नोटीस








