प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: राज्य कामगार विमा योजनेचे लेखा अधिकारी आणि सहाय्यक संचालक जितेंद्र साखरकर यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. वैद्यकीय उपकरण कंपनीची थकीत बिले मंजूर करण्यासाठी त्यांनी साडेसात लाख रुपयांची मागणी केली होती, ज्यापैकी पहिला हप्ता स्वीकारताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराच्या कंपनीला राज्य कामगार विमा योजनेच्या कार्यालयाकडून ४ फेब्रुवारी २६ आणि १३ ऑक्टोबर २६ रोजी वैद्यकीय उपकरणे पुरवण्यासाठी एकूण १६.२८ कोटी रुपयांचे कार्यादेश देण्यात आले होते. या आदेशानुसार कंपनीने उपकरणांचा पुरवठा करून मंजुरीसाठी बिले कार्यालयात जमा केली होती. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून ही बिले प्रलंबित असल्याने तक्रारदार सातत्याने पाठपुरावा करत होते.
या पाठपुराव्यादरम्यान, बिल मंजूर झाल्यानंतर पैसे द्यावे लागतील अशी मागणी लोकसेवकाकडून करण्यात आली होती. अखेर १६ नोव्हेंबर २६ रोजी कार्यालयाकडून ७.५ कोटी रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले. त्यानंतर साखरकर यांनी त्याच दिवशी तक्रारदाराला कार्यालयात बोलावून या कामाचा मोबदला म्हणून ७ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली.
१६ नोव्हेंबरला करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान लाचेच्या मागणीची पुष्टी झाली आणि शक्य होईल तेवढी रक्कम त्याच दिवशी स्वीकारण्याचे निश्चित झाले. त्यानुसार सापळा रचून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना साखरकर यांना ताब्यात घेण्यात आले. सध्या आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बीसीसीआयच्या अंडर-१९ क्रिकेटपटू नंदिनी राठोडची आत्महत्या; दोन तरुणांवर छळवणुकीचा कुटुंबाचा आरोप
- बांगलादेश क्रिकेटमध्ये व्हॅसलीनचा वापर करून चेंडूशी छेडछाड; देशांतर्गत स्पर्धेत गंभीर आरोप
- न्यूझीलंड कसोटी मालिकेतून कुलदीप यादवला वगळले, गुरनूर ब्रारची संघात एन्ट्री








