मुलगा हवा होता, पण झाली मुलगी; लेकीच्या जन्मानंतर २४ तासांत लागली १.५ कोटींची लॉटरी

पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील एका सुताराला मुलीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी दीड कोटींची लॉटरी लागली. या अनपेक्षित बक्षिसामुळे कुटुंबाचे आर्थिक संकट दूर झाले आहे.

Published On: 

Punjab lottery winner Yudhveer Singh success story after daughter birth

मानसा, 14 नोव्हेंबर: पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील बरेटा येथील युधवीर सिंह या २४ वर्षीय सुतारकाम करणाऱ्या तरुणासाठी नोव्हेंबर २०२६ हा महिना आयुष्यातील सर्वात आनंदाचा ठरला आहे. ६ नोव्हेंबर रोजी त्याच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. या घटनेनंतर अवघ्या २४ तासांनंतर, म्हणजेच ७ नोव्हेंबरला युधवीरला ‘पंजाब स्टेट डिअर २०० मंथली लॉटरी’चे तब्बल १.५ कोटी रुपयांचे पहिले बक्षीस लागले.

द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, घरात मुलीचा जन्म झाल्यानंतर काही नातेवाईकांनी ‘मुलगी झाली आहे, आम्हाला मुलगा हवा होता,’ अशी टिप्पणी केली होती. मात्र, युधवीरचा आपल्या लेकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. त्याने आपल्या मुलीचे नाव ‘बरकत’ म्हणजेच समृद्धी असे ठेवले. तिच्या आगमनामुळेच घरात नशीब आणि पैसा आल्याची त्याची ठाम भावना आहे.

लॉटरीचे हे तिकीट युधवीरने ४ नोव्हेंबर रोजी खरेदी केले होते. मुलीच्या जन्माच्या दोन दिवस आधी तो गर्भवती पत्नीला मानसा येथील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेला होता. त्यावेळी बुढलाडा येथील एका दुकानाजवळ मोबाईलचे सिम कार्ड पोर्ट करण्याच्या कामासाठी तो थांबला होता. तिथेच सहज म्हणून त्याने आयुष्यात पहिल्यांदाच लॉटरीचे तिकीट विकत घेण्याचा निर्णय घेतला.

युधवीरच्या या अनपेक्षित निर्णयामुळे त्याची पत्नी सुरुवातीला नाराज झाली होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे लॉटरीवर पैसे खर्च करणे तिला योग्य वाटले नव्हते. याबाबत युधवीरने द ट्रिब्यूनला माहिती देताना सांगितले, ‘तिने मला तपासण्यांसाठी पैसे वाचवायला हवेत, असं सांगितलं होतं.’ विशेष म्हणजे, त्या खासगी रुग्णालयाने त्यांच्या बिलातून ५ हजार रुपये कमी करण्यासही नकार दिला होता.

युधवीरचे २०२४ मध्ये हरमन नावाच्या तरुणीसोबत लग्न झाले. सध्या तो आपले वृद्ध आई-वडील, पत्नी आणि नवजात मुलीसह बरेटा येथे वास्तव्याला आहे. त्याचे वडील रोजंदारीवर काम करतात आणि ते अधूनमधून लॉटरीची तिकिटे खरेदी करायचे. कुटुंबाने दोन खोल्यांचे घर बांधण्यासाठी कर्ज घेतले असून, त्याचे मासिक हप्ते भरण्याचे मोठे आर्थिक आव्हान त्यांच्यासमोर होते.

आता या दीड कोटी रुपयांच्या बक्षिसामुळे कुटुंबावरील कर्जाचा आणि दैनंदिन घरखर्चाचा आर्थिक ताण बऱ्याच अंशी कमी होणार आहे. लॉटरीचे पैसे मिळवण्यासाठी युधवीरने आवश्यक असलेली पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.

ही रक्कम तो आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वापरणार आहे. लेकीच्या शिक्षणासाठी या पैशांची गुंतवणूक करण्याचा त्याचा विचार असून तिने चांगलं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःचं करिअर घडवावं आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं, अशी त्याची इच्छा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही