Vikarabad, 17 नोव्हेंबर: तेलंगणातील १७ वर्षीय क्रिकेटपटू आणि बीसीसीआयच्या अंडर-१९ संघात नुकतीच निवड झालेल्या नंदिनी राठोड हिने शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. विकाराबाद येथील तिच्या आजीच्या घरी तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर तिच्या कुटुंबाने अनिल आणि कृष्णा नावाच्या दोन स्थानिक तरुणांवर तिचा पाठलाग करणे आणि छळवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
नंदिनी मूळची यालाल मंडळातील संगय्यापल्ली गावाची होती. शिक्षण आणि क्रिकेटच्या सरावासाठी ती विकाराबादमधील मधू कॉलनी येथे राहायला आली होती. ती स्थानिक स्टेडियमवर सराव करत असे. कुटुंबाच्या आरोपानुसार, अनिल गेल्या तीन महिन्यांपासून प्रेमाच्या नावाखाली तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता आणि कृष्णा त्याला साथ देत होता.
कुटुंबीयांनी या दोन्ही तरुणांना नंदिनीपासून दूर राहण्याची ताकीद दिली होती. मात्र, जाब विचारल्यानंतर या आरोपींनी नंदिनीला धमकावले होते, असाही दावा कुटुंबाने केला आहे. याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. यानंतर संतप्त कुटुंबीय आणि नातेवाईकांनी विकाराबादमध्ये रास्ता रोको करत दोन्ही तरुणांच्या तत्काळ अटकेची आणि कठोर कारवाईची मागणी केली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. चौकशीसाठी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. विकाराबादचे सर्कल इन्स्पेक्टर (सीआय) रघु यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी विकाराबाद एरिया रुग्णालयात पाठवला आणि संशयास्पद मृत्यूची नोंद केली.
तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी नंदिनीचा मोबाईल जप्त करून न्यायवैद्यक तपासणीसाठी (फॉरेन्सिक) पाठवला आहे. सीआय रघु म्हणाले, “सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी तिला त्रास देत होतं का, हे तपासण्यासाठी आम्ही तिचे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲप खाती तपासू. यातून जे निष्पन्न होईल, त्यानुसार जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जाईल.”
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मात्र, कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांचा आणि नंदिनीच्या मृत्यूचा थेट संबंध आहे का, हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. आत्महत्येमागील नेमकी कारणे अद्याप अस्पष्ट असून डिजिटल पुराव्यांच्या आणि फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करणार आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- छटपूजेला ठाकरे गटाचा विरोध आहे का? संजय राऊतांनी स्पष्ट केली भूमिका; फोन टॅपिंगवरूनही साधला निशाणा
- विराट कोहलीचं खास गिफ्ट! टीम इंडियाला उद्ध्वस्त करणाऱ्या मॅट हेन्रीला दिली जर्सी
- झुरळ आणि उंदराची विष्ठा सापडल्याने KFC आणि डोमिनोजचे आऊटलेट बंद








