प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, १८ ते १९ नोव्हेंबर दरम्यान चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. सध्या एक ट्रफ म्यानमार ते श्रीलंकेपर्यंत आणि दुसरा आंध्र प्रदेशच्या दिशेने सक्रिय आहे. बंगालच्या खाडीत चक्रीवादळाची ही नवी स्थिती निर्माण होत असल्याने महाराष्ट्रातील हवामानावर याचे काय परिणाम होणार, याकडे लक्ष लागले आहे.
हवामान अभ्यासकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, महिन्याभरात तयार होणारे हे तिसरे चक्रीवादळ असून त्याला ‘अकबन’ असे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी २५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान ‘अर्णब’ तर ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या काळात ‘मुरासू’ वादळाचा प्रभाव दिसला होता. आता १६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान ‘अकबन’ नावाची नवीन प्रणाली विकसित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
१३ नोव्हेंबरच्या हवामान अंदाजानुसार तयार झालेल्या या कमी दाबाच्या क्षेत्राचा पुढील प्रवास विविध हवामान मॉडेल्समध्ये वेगवेगळा दर्शवण्यात आला आहे. काही मॉडेल्सनुसार, १९ नोव्हेंबरच्या आसपास ही प्रणाली आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम आणि ओडिशाच्या किनारपट्टीकडे सरकू शकते. तर, हवामान विभागाच्या संभाव्य मार्गिकानुसार हे वादळ म्यानमारच्या दिशेने जाण्याची शक्यता एका व्हिडीओमध्ये वर्तवण्यात आली आहे.
या संभाव्य चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही तातडीचा किंवा मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही. राज्यात सध्या पावसाची कोणतीही ठळक चिन्हे नसून, बहुतांश भागांत हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लगेचच पावसाचे वातावरण तयार होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मध्य भारतातील मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही सध्या हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. मात्र, १९ नोव्हेंबरच्या आसपास चक्रीवादळाची प्रणाली पुढे सरकल्यास छत्तीसगडच्या दक्षिण भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. तसेच ओडिशाच्या काही जिल्ह्यांमध्ये वेगावान वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता व्हिडीओमध्ये वर्तवण्यात आली आहे. सुरुवातीला ‘अकबन’ वादळाची तीव्रता किती असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नसून, कमी दाबाचे क्षेत्र कोणत्या दिशेने सरकते यावरच पुढील हवामानाचा अंदाज अवलंबून असणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- डिलिमिटेशन विधेयकासाठी भाजपला राष्ट्रवादीचे १५-१६ खासदार हवेत; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट
- अमेरिकेत सर्व विमान उड्डाणे अचानक ठप्प; ७ हजार विमानांना फटका, हजारो प्रवासी अडकले
- मीही राष्ट्रवादीत काम केलंय, बरंच काही बोलू शकतो; शिंदेसेनेच्या मंत्र्याचा सुनील तटकरेंना सूचक इशारा






