प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाने पडदा पडला असला, तरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका खळबळजनक दाव्याने राजकारण तापवले आहे. राऊत यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातातील संशयास्पद मृत्यूपूर्वीच्या घडामोडींवरून मोठा गौप्यस्फोट केला. तसेच, या मृत्यूबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार गप्प का आहेत, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर अजित पवार यांचा भ्रमनिरास झाला होता, असा दावा राऊत यांनी केला. तपास यंत्रणा आणि ईडीच्या भीतीमुळेच ते नाईलाजाने महायुतीत गेले होते. त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य नेतेही होते. मुश्रीफ सध्या वाघासारखे छाती पुढे काढून चालत असले तरी त्यांचे काळीज उंदराचे आहे, अशी टीका त्यांनी केली. सत्तेत जाऊनही भाजपने अजितदादांच्या फाईल्स बंद केल्या नाहीत. जरांडेश्वर कारखाना आणि नातेवाईकांवरील धाडी यामुळे ते अस्वस्थ होते. भाजपसोबत स्वाभिमानाने राहता येणार नाही, याची जाणीव त्यांना झाली होती, असे राऊत यांनी नमूद केले.
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी अजितदादा मविआचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला होता. मात्र, राऊतांनी यावर असहमती दर्शवत, ते फारतर उत्तम विरोधी पक्षनेते झाले असते, असे म्हटले. राऊत यांच्या दाव्यानुसार, अजितदादांची मानसिकता केवळ महायुतीतून बाहेर पडण्याचीच नव्हती, तर भाजपशी संघर्ष करण्याची होती. ‘माझ्याकडेही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या फाईल्स आहेत’, असे जेव्हा ते ठासून बोलले, ती उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरली. त्यानंतर काही काळामध्येच त्यांचा विमान अपघातात संशयास्पद मृत्यू झाला, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.
इतक्या मोठ्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू होऊनही कुटुंबातील लोक गप्प कसे, यावर राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले. कुणाचा पती तर कुणाचा बाप गेला आहे, तरीही हे सर्वजण कसे गप्प बसू शकतात? आमचा पुर्णेकर नावाचा एक कार्यकर्ता गेला तरी आम्ही हत्येविरुद्ध लढत आहोत, मात्र अजितदादांच्या मृत्यूबाबत महाराष्ट्र आणि त्यांचे कुटुंब शांत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की, जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांचा या चर्चेत सहभाग होता, मात्र आता तो विषय पूर्णपणे संपला आहे. सुप्रिया सुळे यांनी सांगितलेले सत्य असून यावर पडदा पडला आहे. तरीही काही जण विनाकारण दुसरी-तिसरी घंटा वाजवून नाटक सुरू ठेवत आहेत. अमित शाह यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला गिळले आहे, हे देवेंद्र फडणवीसांनाही समजलेले नाही. वारंवार निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावे लागते, यावरून या नेत्यांचे स्वतःच्या पक्षावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांना कोल्हापुरातून हरवणार; चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले आव्हान
- ‘त्याने मैदानात बाटलीचं झाकण काढलं होतं’, पॅट कमिन्सकडून चेंडूशी छेडछाड पाहिल्याची कबुली
- १६ तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? पोस्टरने उडाली खळबळ








