प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: नागपूरजवळील पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण कार अपघाताबाबत काँग्रेस आणि विरोधकांनी केलेल्या गंभीर आरोपांवर भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या अपघातग्रस्त वाहनामध्ये आपला मुलगा नव्हता, तर तो दुसऱ्या गाडीतून प्रवास करत होता, असा स्पष्ट खुलासा त्यांनी केला आहे. सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
या अपघातात जागीच मृत्यू झालेला तरुण आपल्या मुलासारखाच होता आणि त्याच्या कुटुंबाशी आपले अत्यंत स्नेहाचे संबंध असल्याचे फुके यांनी म्हटले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आपले कुटुंबही दुःखात असून अद्याप त्यातून सावरले नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, कोणतीही ठोस माहिती किंवा वस्तुस्थिती समोर येण्याआधीच जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी आरोप करणे दुर्दैवी आणि आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस आणि काही विरोधी पक्षनेत्यांकडून या घटनेचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात असून, त्यातून निर्माण केले जाणारे राजकीय वातावरण योग्य नसल्याचे फुके म्हणाले. राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सत्य आणि न्याय महत्त्वाचा असल्याचे सांगत, अपघात नेमका कसा घडला आणि त्यावेळी परिस्थिती काय होती, हे पोलिसांच्या निष्पक्ष चौकशीतूनच स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपला कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून कोणत्याही राजकीय दबावाला किंवा अपप्रचाराला बळी न पडता निष्पक्ष चौकशी होऊ द्यावी, सत्य नक्कीच समोर येईल, असे फुके यांनी सांगितले.
तत्पूर्वी, पेंच अभयारण्य परिसरातील या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही अपघातग्रस्त कार परिणय फुके यांच्या मालकीची असून ती त्यांचा मुलगा यथार्थ चालवत असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. तसेच, सत्तेच्या दबावाखाली हे प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘२० वर्षे परिणाम भोगतोय’, ‘सीरियल किसर’ इमेजवर इमरान हाशमीचे स्पष्ट भाष्य
- मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालय, विमानतळासह ५ ठिकाणे टार्गेटवर
- आमदार परिणय फुकेंच्या मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत भीषण अपघात? एकाचा मृत्यू; विरोधकांचे गंभीर आरोप
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







