प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते अंकुश कदम यांनी केलेल्या टीकेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आपण आजवरच्या राजकीय वाटचालीत कधीही छत्रपती घराण्याच्या नावाचा वापर करून मते मागितली नसून, केवळ कामाच्या जोरावरच निवडणुका जिंकल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘छत्रपती घराण्याची कवच कुंडले काढून निवडणुकीत उतरा’ या कदम यांच्या टीकेचा समाचार घेताना शिवेंद्रराजे म्हणाले की, आजवर लढलेल्या चारही निवडणुकांमध्ये आपण ‘छत्रपतींचा वारस’ म्हणून कधीही मते मागितली नाहीत. आपल्याला घराण्याचा सार्थ अभिमान आहे, मात्र राजकारणासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी कधीही त्या नावाचा वापर केलेला नाही.
जनतेच्या मनात राजघराण्याविषयी प्रेम आणि श्रद्धा आहे. मात्र, ज्यांच्याकडे स्वतःचे कर्तृत्व सांगण्यासारखे काहीच नाही, तेच लोक पळवाट काढण्यासाठी शब्दांचा खेळ करत असल्याचा पलटवार त्यांनी केला. असे लोक जाणीवपूर्वक महाराज आणि सामान्य जनता यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शिवेंद्रराजे म्हणाले. तसेच, केवळ निवडणुका आल्यावरच विरोधकांचा ‘जावळीचा स्वाभिमान’ कसा जागा होतो आणि इतर वेळी तो मुंबईला का निघून जातो? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.
यापूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते अंकुश कदम यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर निशाणा साधला होता. लोकशाहीत राजकीय टीका आणि प्रश्नांपासून वाचण्यासाठी छत्रपती या शब्दाचा किंवा गादीचा ‘कवच-कुंडले’ म्हणून वापर करू नये, असे कदम म्हणाले होते. १५ वर्षे जनतेतून निवडून आलेले आमदार आणि सध्या राज्याचे मंत्री असलेल्या जावळीच्या लोकप्रतिनिधीला आपण प्रश्न विचारले आहेत, ते गादीला विचारलेले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे स्वतःची पापे लपवण्यासाठी ‘छत्रपतींचा अपमान झाला’ असा कांगावा करून घराण्याला बदनाम करू नका, असेही कदम यांनी सुनावले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘२० वर्षे परिणाम भोगतोय’, ‘सीरियल किसर’ इमेजवर इमरान हाशमीचे स्पष्ट भाष्य
- मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालय, विमानतळासह ५ ठिकाणे टार्गेटवर
- आमदार परिणय फुकेंच्या मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत भीषण अपघात? एकाचा मृत्यू; विरोधकांचे गंभीर आरोप
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








