कुरई, 12 नोव्हेंबर: मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्यालगत कुरई परिसरात ४ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या एका भीषण कार अपघातात नागपूरच्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, भाजप आमदार परिणय फुके यांचा मुलगा यथार्थ ही गाडी चालवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मात्र, फुके कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
या अपघातात रेहान अली ऊर्फ झिदान या नागपूरच्या तरुणाचा मृत्यू झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी असा आरोप केला आहे की, अपघातग्रस्त गाडी (एमएच ४० एएच ७२२७) आमदार फुके यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असून, घटनेच्या वेळी त्यांचा मुलगा यथार्थ तिथे उपस्थित होता. तोच मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
यावर फुके कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, घटनास्थळी दोन गाड्या होत्या आणि त्या दोन्ही गाड्या व्यावसायिक चालक (प्रोफेशनल ड्रायव्हर) चालवत होते. यथार्थ फुके हा पहिल्या गाडीत होता आणि त्या गाडीचा कोणताही अपघात झालेला नाही. तर, मागून येणाऱ्या दुसऱ्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, ज्यात रेहान अलीचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त गाडीत आमदार फुके यांचा मुलगा नव्हता, असा दावा सूत्रांनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावाखाली दोषींना न वाचवता निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये संताप व्यक्त करत म्हटले आहे की, ‘एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळात होरपळत असताना आमदारांची मुले मात्र भरधाव गाड्या फिरवत आहेत.’ पेंचवरून नागपूरकडे येताना पाच मुले व पाच मुली दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत होते, असा आरोप त्यांनी केला.
या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण अतिगंभीर असल्याचे सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, अपघातग्रस्त गाडी आमदार फुके यांच्या नावावर असून चालक यथार्थ फुके हा गंभीर जखमी झाल्याचा आणि मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील कुरई पोलीस ठाण्यात एमएलसी (MLC) नोंद झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
या घटनेची कुरई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मात्र, घटनास्थळी एक गाडी होती की दोन, याबाबत मध्य प्रदेश पोलिसांनी अद्याप कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा एकदिवसीय सामना: खेळपट्टी, हवामान आणि संभाव्य प्लेइंग 11
- ‘ते वाक्य रागाच्या भरात बोलून गेलो’; गोकुळमध्ये सत्ता येताच हसन मुश्रीफांना उपरती
- सराव सत्रात अर्शदीप सिंगने बाद केल्यानंतर विराट कोहली संतापला
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








