वॉशिंग्टन, 12 नोव्हेंबर: अमेरिकेने लागू केलेल्या कडक निर्बंधांना वाटाण्याच्या अक्षता लावत चीनने अत्यंत प्रगत तंत्रज्ञान मिळवल्याचे उघड झाले आहे. चिनी लष्कराशी संबंधित एका विद्यापीठाने अमेरिकेतील सर्वाधिक शक्तिशाली ‘एनव्हिडिया एच २००’ (Nvidia H200) एआय चिप्स मिळवल्या असून, या प्रकारामुळे वॉशिंग्टनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या संरक्षण संशोधन आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमात सहभागी असलेल्या ‘नॉर्थवेस्टर्न पॉलिटेक्निकल युनिव्हर्सिटी’ने गेल्या महिन्यात सुमारे १.२३ लाख डॉलर खर्च करून दोन H200 चिप्स विकत घेतल्या. हे विद्यापीठ २००१ पासून अमेरिकेच्या व्यापारविषयक काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) आहे. या चिप्स थेट एनव्हिडियाकडून न घेता, ‘शान्शी बोसुआन नेटवर्क टेक्नॉलॉजी’ या स्थानिक तृतीय-पक्ष (थर्ड पार्टी) कंपनीच्या माध्यमातून मिळवण्यात आल्या आहेत.
या ताज्या खुलाशामुळे एनव्हिडिया कंपनी आणि तिचे सीईओ जेनसन हुआंग यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. चीनला केल्या जाणाऱ्या एआय चिप्सच्या पुरवठ्यावरील निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी केल्यामुळे हुआंग आधीपासूनच अमेरिकी सरकारच्या रडारवर आहेत. याशिवाय एका संशयित चिनी हेराशी असलेल्या कथित संबंधांवरूनही त्यांची चौकशी सुरू आहे. या सर्व घडामोडींवर स्पष्टीकरण देण्यासाठी अमेरिकन काँग्रेसच्या तीन रिपब्लिकन समिती अध्यक्षांनी हुआंग यांना १८ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
हा अहवाल केवळ चिप्स खरेदीपुरता मर्यादित नाही. निर्बंधांना बगल देण्यासाठी चिनी संस्था काळ्या बाजारातून खरेदी करण्यासोबतच क्लाउड सेवा आणि तृतीय-पक्ष पुरवठादारांकडून H200, A100 आणि A800 सारख्या निर्बंधित चिप्स असलेले सर्व्हर भाड्याने घेत असल्याची माहिती समोर आली आहे. नॉर्थवेस्टर्न पॉलिटेक्निकल युनिव्हर्सिटीव्यतिरिक्त शेनझेन युनिव्हर्सिटी, वुहान युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि लष्करासाठी एअरोस्पेस संशोधन करणाऱ्या बेइहांग युनिव्हर्सिटीनेही लाखो रुपये खर्चून या निर्बंधित चिप्स मिळवल्या आहेत.
या शक्तिशाली एआय चिप्स चीनच्या हाती लागल्याने त्यांची शस्त्रास्त्र निर्मिती, लष्करी आधुनिकीकरण आणि गुप्तचर माहितीचे विश्लेषण अधिक वेगाने होऊ शकते. हा प्रकार थेट अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचा इशारा अमेरिकी खासदारांनी व्यक्त केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार; आदिवासी योजनांचीही दिली माहिती
- इंग्लंड संघात दोन मोठे बदल; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून जेकब बेथेल आणि जोश टंग बाहेर
- विलीनीकरणाच्या चर्चेवर सुनेत्रा पवारांचे सूचक वक्तव्य; म्हणाल्या, ‘जशी वेळ येईल तशा…’
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








