प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: स्व. अजित पवार हे महायुती सोडणार होते, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी कडक शब्दांत आक्षेप नोंदवला. या दाव्याला पुष्टी देणारे दादांचे कोणते अधिकृत विधान, पत्र किंवा विश्वासार्ह नोंद आहे का, असा सवाल करत पाटील यांनी तो पुरावा महाराष्ट्रासमोर जाहीर करण्याचे आव्हान दिले. तसेच, स्व. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत दावे करताना अधिक जबाबदारीने बोलण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राजकारणात आरोप करण्याचा सर्वांना अधिकार असला तरी, तो सिद्ध करण्याची जबाबदारी आरोप करणाऱ्याचीच असते, असेही पाटील म्हणाले.
याचबरोबर अतुल लोंढे यांनी भारतीय जनता पक्षावरही जोरदार टीका केली होती. मित्रपक्षांना सोबत घेऊन सत्ता मिळवायची आणि नंतर त्यांचे राजकीय महत्त्व कमी करायचे, असे ‘वापरा आणि फेका’ (Use and Throw) धोरण भाजप राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर पलटवार करताना उमेश पाटील यांनी लोंढे यांना राजकीय आरोप करताना इतिहास आणि आकडेवारी तपासण्याचा सल्ला दिला. एनडीएचा (NDA) २८ वर्षांचा इतिहास आणि भाजपचे मित्रपक्षांसोबतचे दीर्घकालीन संबंध लोंढे सोयीस्करपणे विसरत आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भाजपच्या मित्रपक्षांसोबतच्या राजकीय संबंधांची आकडेवारी उमेश पाटील यांनी पुराव्या दाखल मांडली. यामध्ये शिवसेना-भाजप युतीचा ३७ वर्षांचा इतिहास, जनता दल (युनायटेड) आणि समता पार्टीसोबत ३० वर्षे, तेलुगू देसमसोबत २८ वर्षे, अपना दलसोबत १२ वर्षे आणि आसाम गण परिषदेसोबत १० वर्षांचे संबंध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याव्यतिरिक्त एनडीपीपीसोबत ८ वर्षे, निषाद पार्टीसोबत ७ वर्षे, जनता दल (सेक्युलर) सोबत ३ वर्षे, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत ३ वर्षांहून अधिक काळ भाजपचे संबंध असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या राजकीय वाटचालीत काही ठिकाणी मतभेद झाले, आघाड्या तुटल्या आणि पुन्हा जुळल्याही, ही वस्तुस्थिती लपवण्याचे कारण नाही, अशी कबुली उमेश पाटील यांनी दिली. मात्र, दशकानुदशके चाललेले राजकीय सहकार्य दुर्लक्षित करून भाजपवर सरसकट ‘वापरा आणि फेका’ असा निष्कर्ष काढणे कितपत वस्तुनिष्ठ आहे, असा सवाल त्यांनी केला. राजकीय मतभेद जरूर असावेत, पण आरोप करताना त्याला इतिहासाची आणि आकडेवारीची जोड असावी. तसेच, अजितदादांबाबत केलेल्या दाव्याला लोंढे यांनी पुराव्यांसह उत्तर द्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- ओमराजे निंबाळकरांना चिमुकल्याचा थेट फोन; ‘मामाची गाडी घासली, रस्ते कधी नीट करणार?’, ऑडिओ क्लिप व्हायरल
- स्टुअर्ट मॅकगिलचा मोठा गौप्यस्फोट; ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील बॉल टॅम्परिंगबाबत केली धक्कादायक कबुली
- HDFC बँकेचा कर्जदारांना धक्का; MCLR दरांमध्ये वाढ, EMI महागणार
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








