मुंबई, 11 नोव्हेंबर: एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) ग्राहकांना धक्का देत कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी आपला मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) ५ ते १५ बेसिस पॉईंट्सनी वाढवला आहे. यामुळे बँकेतून गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा इतर कोणतीही कर्जे घेतलेल्या ग्राहकांचा ईएमआय (EMI) आता महागणार आहे. हे नवीन दर ७ नोव्हेंबर २०२६ पासून लागू करण्यात आले आहेत.
या बदलानंतर एचडीएफसी बँकेचे एमसीएलआर दर आता ७.८५ टक्के ते ८.७० टक्क्यांच्या दरम्यान पोहोचले आहेत. यापूर्वी हे दर ७.७५ टक्के ते ८.५५ टक्क्यांच्या घरात होते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार एमसीएलआर हा असा किमान व्याजदर असतो, ज्यापेक्षा कमी दराने कोणतीही बँक ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाही. कर्जाचे वितरण करण्यासाठी हा एक बेस रेट मानला जातो.
एमसीएलआरमध्ये वाढ झाली असली तरी, ग्राहकांचा हप्ता लगेच वाढणार नाही. फ्लोटिंग रेट असलेल्या कर्जांमध्ये ‘व्याजदर रीसेट’ होण्याची एक ठराविक तारीख निश्चित केलेली असते. कर्ज करारानुसार जेव्हा ही पुढील रीसेट तारीख येईल, तेव्हाच वाढीव ईएमआय लागू होईल. मात्र, ज्या ग्राहकांचे कर्ज थेट रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटशी जोडलेले आहे, त्यांच्यावर या एमसीएलआर वाढीचा कोणताही परिणाम होणार नाही.
एमसीएलआर आणि रेपो रेट यांच्या कार्यपद्धतीत फरक आहे. एमसीएलआर हा पूर्णपणे बँकेच्या अंतर्गत खर्चावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, जर बँकेत फिक्स्ड डिपॉझिट (FD) द्वारे कमी निधी जमा होत असेल, तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका मुदत ठेवींचे व्याजदर वाढवतात. यामुळे बँकांचा खर्च वाढतो आणि त्याची भरपाई करण्यासाठी त्यांना आपला एमसीएलआर वाढवावा लागतो.
दुसरीकडे, रेपो रेट हा असा दर आहे ज्यावर आरबीआय देशातील बँकांना कर्ज देते. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यास, बँकांना काही महिन्यांतच त्यांच्या कर्जाचे व्याजदर वाढवणे अनिवार्य असते. त्याचप्रमाणे, रेपो दरात कपात झाल्यास बँकांनाही त्यांचे व्याजदर कमी करावे लागतात.
📌 महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला सुनेत्रा पवारांचाच विरोध; नियंत्रण जाण्याच्या भीतीने प्रक्रिया थांबली
- वादळी मुलाखतीनंतर उस्मान ख्वाजाच्या ‘सबर’ पुस्तक दौऱ्यात बदल
- सय्यद मुश्ताक अली करंडक २०२६-२७ साठी केरळच्या संघाची घोषणा; संजू सॅमसनकडे पुन्हा कर्णधारपद
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








