कोल्हापूर, 9 नोव्हेंबर: कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघावर पाच शासकीय संचालक नेमण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने अद्याप गुप्त ठेवलेली यातील चार संचालकांची नावे पाटलांनी सोमवारी एका मोर्चात सर्वांसमोर जाहीर केली. तसेच, गोकुळच्या निवडणुकीनंतर शासकीय संचालक नेमण्याचा हा निर्णय केवळ मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्या आग्रहाखातर घेण्यात आल्याचा मोठा दावाही त्यांनी केला.
या निर्णयाच्या निषेधार्थ सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी कोल्हापूरमध्ये दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राजू शेट्टी, विश्वजीत कदम, विशाल पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील आणि पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते सहभागी झाले होते. महायुती सरकारने गोकुळवर पाच शासकीय संचालक नेमण्यासाठी अध्यादेश काढला असून, राज्यपालांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, यापैकी चार जणांना गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.
मोर्चाच्या व्यासपीठावरून बोलताना सतेज पाटील यांनी माजी मंत्री या नात्याने अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चार नावे उघड केली. यामध्ये शिवाजी आडनाईक (पन्हाळा), स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, कृष्णात पाटील (कागल) आणि सांगलीचे अॅड. प्रशांत पाटोळे यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापुरातील सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून सांगलीच्या माणसाची नियुक्ती का केली, असा सवाल करत यापैकी किती जणांकडे म्हशी आहेत, अशी विचारणा पाटलांनी केली. तसेच, मुश्रीफांसह इतरांना आपल्या माणसांना तिकीट देता आले नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
१०० वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी आणलेला सहकार कायदा आज त्यांच्याच भूमीत पायदळी तुडवला जात असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली. जिल्ह्यात १० आमदार, दोन खासदार आणि मंत्र्यांची फौज असतानाही जनतेने आपल्याला कौल दिल्याचे ते म्हणाले. आपण साडेपाच लाख शेतकऱ्यांसाठी लढत होतो, तर हसन मुश्रीफ केवळ आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी लढत होते, असा थेट आरोप त्यांनी केला.
गोकुळच्या निकालानंतर मुश्रीफांनी आपला मुलगा पडल्याची खंत चार वेळा व्यक्त केली. मात्र, मातंग समाजाचे सुजित मिणचेकर आणि मराठा समाजातील युवराज पाटील पराभूत झाल्यावर ते काहीही बोलले नाहीत, अशी आठवण करून देत सतेज पाटलांनी मुश्रीफांवर निशाणा साधला. कुणी सोडून गेले तरी आपण घाबरणार नसून, मैदानात लढणारे पाटील आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND VS NZ 3rd ODI: हॅमिल्टनमध्ये मुसळधार पाऊस, भारत-न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना रद्द होणार?
- ‘गोकुळ’च्या वादात भाजप नेते नवनाथ बन यांची उडी; संजय राऊतांना दिला ‘मातोश्री’वर मोर्चा काढण्याचा सल्ला
- आयटी सेलकडून मला धमक्या, पण भूमिकेवर ठाम; कोल्हापुरात विवेकानंद पाटील यांचा एल्गार
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








