कोल्हापूर, 9 नोव्हेंबर: कोल्हापुरात ‘गोकुळ’वरील संचालकांच्या नियुक्तीविरोधात आणि प्रशासक आणण्याच्या निर्णयाविरुद्ध आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली. हा मोर्चा आता केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित राहिला नसून, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून लोक आल्याने तो महाराष्ट्रव्यापी झाल्याचा दावा पाटील यांनी केला. पदाची शपथ घेताना कुणाबद्दलही ममत्व बाळगणार नाही किंवा सूडबुद्धीने वागणार नाही असे म्हटले जाते. मात्र, तरीही वारंवार ठराविक लोकांनाच झुकते माप का दिले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सहकाराचा कायदा पायदळी तुडवला जात असल्याचा आरोप करत पाटील म्हणाले की, ‘गोकुळ’वर प्रशासक आणू नये म्हणून आपण वारंवार विनंती केली होती. जयंत पाटील यांनीही विधानसभेत मुख्यमंत्र्यांना प्रशासक आणण्याबाबत जाब विचारला होता. त्यावर गोकुळसाठी आम्ही कायदा करत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, दुर्दैवाने केवळ गोकुळवर प्रशासक आणण्यासाठीच हा कायदा करण्यात आला. आपण गेल्या सहा महिन्यांपासून याबाबत सांगत होतो. अखेर या कायद्याविरोधात आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागली आणि निवडणुका लागाव्यात म्हणून प्रयत्न करावे लागले, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे लोक यामागे केवळ एक ‘अदृश्य शक्ती’ असल्याचे सांगत होते, मात्र ही अदृश्य शक्ती कोण आहे हे सांगण्याचे धाडस हसन मुश्रीफ यांच्यात नव्हते, असा टोला त्यांनी लगावला. आपण सत्तेच्या दाराजवळ जाऊन बसलो नसून मैदानात उतरून लढणारा माणूस आहोत. तुम्ही सोडून गेला तरी मी घाबरलो नाही, असे पाटील म्हणाले. स्वतःवर होणाऱ्या जातीवादाच्या आरोपांबाबत बोलताना त्यांनी मुश्रीफांना चार वेळा विचार करण्याचा सल्ला दिला. १५ वर्षे सोबत राहून आणि चार वेळा निवडणूक लढवूनही तुम्हाला दार उघडता आले नव्हते, केवळ माझ्यामुळेच तुम्हाला गोकुळमध्ये प्रवेश मिळाला, अशी आठवण त्यांनी करून दिली.
समोर तीन-तीन मंत्री, खासदार आणि आमदार जिल्ह्यात ठाण मांडून बसले असतानाही, संघर्षाच्या काळात जिल्ह्यातील अनेक लोकांनी आपल्याला खांद्याला खांदा लावून मदत केली. आपण राजू शेट्टी यांच्यासोबत लोकांमध्ये गेलो आणि प्रत्येक तालुक्यात दोन-दोन दिवस राहून पायाला भिंगरी लावून फिरलो. या काळात आपण २२ दिवस अँटिबायोटिक्सवर होतो. एका कार्यकर्त्याच्या घरी जेवायला गेलो असताना पहिला मजलाही चढता येत नव्हता, अशी आठवण त्यांनी सांगितली. आपण साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत होतो, तर विरोधक केवळ स्वतःच्या मुलाबाळांना निवडून आणण्यासाठी लढत होते, असा घणाघात त्यांनी केला.
निवडणुकीतील आपले सर्व २५ उमेदवार हे सामान्य कार्यकर्ते होते, त्यात आपली मुले किंवा नातेवाईक नव्हते. या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला, तर त्यात जातीवाद कुठून आला? असा प्रश्न सतेज पाटील यांनी विचारला. आपण शाहू महाराजांच्या पायाजवळ बसलो असून जातीवाद पाळणारे लोक नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुश्रीफ यांनी ‘माझा मुलगा पडला’ हे चार वेळा सांगितले. मात्र, मातंग समाजातील उमेदवार सुजित मिनचेकर आणि मराठा समाजातील बापू पडले, तेव्हा त्यांच्या तोंडून चकार शब्दही निघाला नाही. यावर आपण बोललो तर चालेल का? पण आपण तसे बोलणार नाही, असेही पाटील यांनी शेवटी नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांवर घणाघात; मातंग, मराठा समाजाचे उमेदवार पडले, मग दुःख फक्त मुलाचेच का?
- मोठी घोषणा! विवेकानंद पाटील लढवणार विधानसभा, चंद्रकांत पाटलांना दिलं खुलं आव्हान
- रॉकेट फटाक्यांवर बंदी; आगीच्या घटनांनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







