प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: ऑकलंडच्या ईडन पार्कवर झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८७ धावांनी धुव्वा उडवला. पहिल्या तीन सामन्यांतील पराभवानंतर मालिकेत न्यूझीलंडला अखेर पहिला विजय मिळाला. पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये धावांच्या अंतराने भारताचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने निराशा व्यक्त केली असून या दारुण पराभवाचे खापर त्याने गोलंदाजांवर फोडले आहे.
या पराभवासह SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये सर्वाधिक सामने गमावणाऱ्यांच्या यादीत श्रेयस अय्यर आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारतीय संघात वैभव सूर्यवंशी आणि भुवनेश्वर कुमार यांना वगळून इशान किशन व मयंक यादव यांना संधी देण्यात आली. तर न्यूझीलंडने काईल जेमिसनच्या जागी नॅथन स्मिथला संघात घेतले.
गोलंदाजीची सुरुवात करताना मयंक यादवने टिम सायफर्टला लवकर बाद करत भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली. त्यानंतर डॅरिल मिशेललाही मयंकनेच तंबूचा रस्ता दाखवला. एका क्षणी न्यूझीलंडची अवस्था २ बाद ३४ अशी झाली होती. मात्र, त्यानंतर ग्लेन फिलिप्सने फिन ॲलनसोबत मिळून छोटी भागीदारी रचली. ॲलन १७ चेंडूत ३१ धावा करून परतला. यानंतर फिलिप्स आणि मायकेल ब्रेसवेल यांनी ४० चेंडूंमध्ये ११५ धावांची वेगवान भागीदारी करत सामन्याचे चित्रच पालटले.
ब्रेसवेलने २५ चेंडूत ६५ धावा चोपल्या, तर ग्लेन फिलिप्सने अवघ्या ४९ चेंडूत १० षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने १०७ धावांची तडाखेबंद शतकी खेळी केली. या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद २५९ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून मयंक यादव हा एकमेव यशस्वी गोलंदाज ठरला; त्याने ४ षटकांत ४८ धावा देत ३ बळी घेतले.
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. संजू सॅमसन लवकर बाद झाला, तर इशान किशनला भोपळाही फोडता आला नाही. अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरने थोडी भागीदारी केली, मात्र त्यानंतर ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्या. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक ३५ धावा केल्या; एकाही फलंदाजाला या सामन्यात अर्धशतक गाठता आले नाही. परिणामी, भारतीय संघाला २० षटकांत ९ बाद १७२ धावांपर्यंतच मजल मारता आली.
श्रेयस अय्यर म्हणाला, “हो, नक्कीच. मला वाटतं आम्ही सुरुवातीला गोलंदाजीत थोडे कमी पडलो. विशेषतः पॉवरप्लेमध्ये, तिसऱ्या षटकानंतर त्यांना लय मिळाली आणि त्यानंतर काही गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण ग्लेन फिलिप्सने अत्यंत उत्कृष्ट खेळी केली. त्याने मारलेले काही शॉट्स अप्रतिम होते. त्याचे नक्कीच कौतुक करायला हवे. तो या संपूर्ण मालिकेत सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.”
गोलंदाजीबाबत पुढे बोलताना अय्यर म्हणाला, “नक्कीच, या पराभवाचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे आणि आम्ही कुठे पुनरागमन करू शकतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. हॅमिल्टनमध्ये होणाऱ्या पुढच्या सामन्यापूर्वी आमच्याकडे केवळ एक दिवसाची विश्रांती आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या रणनीतीचा पुन्हा एकदा विचार करावा लागेल. पुढच्या सामन्यात आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू.”
📌 महत्वाच्या बातम्या
- स्मृती मंधानाचा खुलासा: वर्ल्ड कप विजयानंतर धोनीने पाठवला होता खास व्हॉट्सॲप मेसेज
- शेतकऱ्यांबाबतच्या विधानावरून एकनाथ शिंदे संतापले; आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
- “तुझी लायकी किती तू बोलतो किती!” नवनाथ बन यांच्या आरोपांनंतर निलेश राणे आक्रमक; महायुतीत वाद
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








