प्रतिनिधी, 30 ऑक्टोबर: शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर पक्षाकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत संतप्त झाले असून, त्यांनी गायकवाड यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे आणि त्याच्याविरोधातील कोणतेही विधान खपवून घेतले जाणार नाही, अशी सक्त ताकीद एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावर उद्विग्न प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केले होते. शेतकरी कोणताही विचार न करता आत्महत्या करतात आणि स्वतःच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडतात. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारालाही कोणी जाऊ नये, असे गायकवाड म्हणाले होते. तसेच, शेतकऱ्याला काही अडचण असल्यास त्याने आत्महत्या करण्याऐवजी आमदार किंवा खासदारांना चिठ्ठी लिहावी, आम्ही सर्व मिळून त्याची मदत करू, असा सल्लाही त्यांनी दिला होता. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली.
एकीकडे शिवसेनेकडून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी व्यापक मदत मोहीम राबवली जात आहे. शेतकरी कुटुंबांतील लाडक्या बहिणींना २५ हजार शिलाई मशीन आणि शेतकऱ्यांच्या मुलींना २५ हजार सायकलींचे वाटप केले जात आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने १०० ट्रक, तर गुरुवारी आणखी २४ ट्रक अन्नधान्य दुष्काळग्रस्त भागात पाठवण्यात आले. पक्षाकडून शेतकऱ्यांसाठी इतके ठोस काम सुरू असताना, गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेनेची प्रतिमा नाहक मलीन होत असल्याची भावना पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणामुळे वादात सापडलेल्या ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत दबावामुळे किंवा अन्य कारणांमुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राजीनामा दिला असून, त्या आता केवळ ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत राहणार आहेत. दुसरीकडे, आमदार श्वेता महाले यांनीही संजय गायकवाड यांच्यावर पुन्हा निशाणा साधला असून, ‘काही लोक स्वतःच्याच मस्तीत असतात आणि पक्षश्रेष्ठींनाही महत्त्व देत नाहीत’, अशी टीका त्यांनी केली आहे.







