प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरून सध्या शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये खडाजंगी सुरू असून, शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी यावर सडेतोड मत मांडले आहे. या क्लिपमधून एकनाथ शिंदे आणि भाजप या दोघांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न झाला असून, भाजप निवडणुकीत कसे फंडे वापरते हे यातून पुढे आल्याचे कडू यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ५०० कोटींचा विषय छोटा नाही; मात्र ऑडिओ क्लिपमधील महिला केवळ मोठेपणाचा आव आणून गोष्टी रंगवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या काळातील हा प्रकार आहे त्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होत नसून, काही जण आपल्याला सर्व माहीत असल्याचा दावा करत आहेत. एका कार्यालयातील कारकुनाने ती क्लिप एका मोठ्या माणसाला दिली आहे. त्यामुळे ही क्लिप आताच बाहेर का आली आणि ती एखाद्या मोठ्या नेत्याने दिली आहे का? याचा तपास झाला पाहिजे. यातून नेमका कोणाला फायदा होणार आहे हेही तपासले जावे. यामागे चुकीचे प्लॅनिंग असेल तर आपण त्याचा निषेध करतो, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणामागे भाजपचे अंतर्गत आणि खालच्या दर्जाचे राजकारण असल्याचा आरोप करत, यात पक्षाचे मोठे नेते सामील नसावेत अशी अपेक्षा कडू यांनी व्यक्त केली. या सर्व प्रकारामुळे दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडते की काय, अशी अवस्था सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप थांबवून एकत्रित बसावे आणि ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ करावे. दोन्ही पक्षांना बदनाम करणाऱ्या ‘झारीतील शुक्राचार्या’चा शोध घेऊन अशा गोष्टींवर नियंत्रण मिळवले पाहिजे, असे स्पष्ट मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.







