प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे येत्या २७ तारखेला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. दुपारी ४ वाजेपर्यंतच्या अंदाजानुसार या विभागात एकूण ९१.०८ टक्के मतदान झाले. वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक ९२.८७ टक्के मतदान झाले. याखालोखाल यवतमाळमध्ये ९२.१७ टक्के, अकोला ९२.१२ टक्के, बुलढाणा ९०.७५ टक्के, तर अमरावती जिल्ह्यात ८९.३६ टक्के मतदारांनी हक्क बजावला.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंदाजे ६०.६९ टक्के मतदान पार पडले. या विभागात वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ६८.८६ टक्के आणि भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी ५२.३५ टक्के मतदानाची नोंद झाली. याशिवाय गडचिरोलीत ६८.७८ टक्के, गोंदियात ६२.५७ टक्के, नागपूरमध्ये ६०.२० टक्के आणि चंद्रपूर जिल्ह्यात ५८.२० टक्के मतदान झाले.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सरासरी ५९.६२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ६२.५३ टक्के, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी ५५.७३ टक्के मतदान झाले. तसेच परभणीत ६१.८१ टक्के, हिंगोलीत ६१.५८ टक्के, नांदेड आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांत ५९.८१ टक्के, बीडमध्ये ५९.६७ टक्के आणि लातूरमध्ये ५६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मराठवाडा मतदारसंघातील नांदेड जिल्ह्यात सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत १२५ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील एकूण ३६ हजार ६८७ मतदारांपैकी २१ हजार ९४२ जणांनी (५९.८१ टक्के) मतदान केले. यामध्ये पुरुष मतदारांची टक्केवारी ६३.३६ टक्के, तर महिला मतदारांचा सहभाग ४७.०७ टक्के राहिला.
पुणे विभागातील दोन्ही मतदारसंघांमध्येही मतदानाचा टक्का वेगवेगळा राहिला. पुणे पदवीधर मतदारसंघात ६२ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले, तर शिक्षक मतदारसंघात ८२ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली. सर्व ५ जागांचे चित्र आता ईव्हीएममध्ये बंद झाले असून, २७ तारखेच्या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांनी साथ दिली नसती तर शिंदेंचा जीव धोक्यात आला असता; रामदास कदमांच्या आरोपांवर नितेश राणेंचा पलटवार
- रामदास कदम आक्रमक नेते, प्रसाद लाडांनी त्यांच्या वयाचा आदर राखावा; ऑडिओ क्लिप वादावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
- भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या हे खपवून घेणार नाही; रामदास कदमांच्या टीकेवर दरेकरांचा पलटवार








