मुंबई, 21 ऑक्टोबर: मुंबईत पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन ३.०’ बाबत सूचक विधान केले आहे. पत्रकार मला वारंवार विचारतात की ऑपरेशन १ आणि २ झाले, आता ऑपरेशन ३.० कधी होणार? यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की, “डॉक्टर तारीख देतात, पण आम्ही ऑपरेशन सांगून करत नाही, थेट करतो.” श्रीकांत इथे बसला आहे, मी डॉक्टर नसलो तरी मोठी ऑपरेशन्स करतो, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची ताकद दाखवून देत, आज शिवसेनेकडे १५ खासदार, ७४ आमदार आणि एक हजारांहून अधिक नगरसेवक असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपल्यासोबत येण्यासाठी लोकांच्या मोठ्या रांगा लागल्याचा दावाही त्यांनी केला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना शिंदे यांनी शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले. सरकारने दुष्काळ जाहीर केला असून शिक्षण, कर्जवसुली, वीजबिलं, चारा आणि पाण्यासह १२ सवलती दिल्या जात आहेत. एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून ५ हजार रुपयांची तातडीची मदत दिली जात असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. परभणीपासून ‘लाडक्या बहिणींना’ २५ हजार शिलाई मशीन आणि २५ हजार सायकलींचे वाटप सुरू केले आहे. तसेच, ज्या शेतकरी कुटुंबातील मुलींची लग्ने ठरली आहेत, त्यांच्या सामूहिक विवाहाची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. विरोधकांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर उत्तर देताना त्यांनी सरकारसाठी ३२ हजार कोटी रुपये दिल्याचे नमूद केले. आम्ही भाषण देणारे नाही, तर राशन देणारे लोक आहोत, असेही ते म्हणाले.
केंद्राकडून मिळणाऱ्या सहकार्याबाबत शिंदे म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती दिली असून दोघांनीही राज्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान मोदींवर सतत आरोप करणाऱ्या विरोधकांवर त्यांनी कडाडून टीका केली. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही आणि ज्यांना ३६ देशांनी नागरी पुरस्कार देऊन गौरवलेले आहे, अशा मोदींची विरोधक बदनामी करत आहेत. यूपीए सरकारने महाराष्ट्राला केवळ २ लाख कोटी दिले, तर मोदी सरकारने १२ लाख कोटी दिले असून ३२ कोटी लोकांना अन्नधान्य देण्याचे काम सरकार करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. हा ‘नवा भारत’ असून तो पाकिस्तानच्या घरात घुसून मारणारा भारत असल्याचेही ते म्हणाले.
इंडिया आघाडीवर निशाणा साधत शिंदे यांनी विरोधकांना ‘१० तोंडी रावण’ म्हटले आणि या रावणाचे दहन करायचे असल्याचे सांगितले. विरोधक बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमधील परिस्थितीचे दाखले देऊन हिंदुस्थानात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुप्रीम कोर्टावर मोर्चे काढणे हा न्यायव्यवस्था आणि संविधानावर हल्ला असल्याचे ते म्हणाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची आठवण करून देत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाल्याचा आरोप केला. भाजप-शिवसेना युतीला मतदान झाले असताना मविआसोबत जाणे हीच खरी ‘वोटचोरी’ आणि ‘दरोडा’ होता, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या काळात बूथ कॅप्चरिंग व्हायचे, आता हेच विरोधक मतदार याद्यांवरून सोईचे राजकारण करत फेक नॅरेटिव्ह पसरवत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- झोपेतून उठल्यावर हात सुन्न का होतात? जाणून घ्या यामागची कारणे आणि धोके
- मी पुराव्याशिवाय बोलत नाही, शिंदेंनी ५०० कोटींच्या देवाणघेवाणीवर सत्य सांगावे: मनोज जरांगेंचा इशारा
- मोठ्या नेत्यांवर आरोप करताना विचार करा, शिंदेंचे महत्त्व कमी होणार नाही : नरेश म्हस्के
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







