प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: कामगार आयुक्त कार्यालयाच्या माथाडी निरीक्षक भरती परीक्षेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अंधारे जाणीवपूर्वक खोटा नॅरेटिव्ह पसरवत असून त्यांचा पुन्हा एकदा अभ्यास कमी पडल्याची खोचक टीका पाचपुते यांनी केली. शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा त्यांनी आधी अभ्यास करावा, असा सल्लाही पाचपुते यांनी दिला.
कोणताही आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासावी आणि दिशाभूल करणारी विधाने टाळावीत, असे आमदार पाचपुते म्हणाले. अभ्यासाच्या अभावामुळेच कदाचित अंधारे यांच्यावर बेरोजगार राहण्याची वेळ आली असावी, असा टोला त्यांनी लगावला. संबंधित गट-क परीक्षा आपण घेतलीच नसल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) प्रसिद्धीपत्रकाद्वारे आधीच स्पष्ट केल्याचा दावाही पाचपुते यांनी यावेळी केला.
तत्पूर्वी, एका पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी या भरती प्रक्रियेत मोठ्या गैरप्रकाराचा खळबळजनक आरोप केला होता. नागपूरमधील एकाच परीक्षा केंद्रावरून तब्बल २४ विद्यार्थी टॉपर कसे आले, असा थेट प्रश्न विचारत त्यांनी संपूर्ण निकालाच्या आणि भरती प्रक्रियेच्या चौकशीची मागणी केली होती. पेपरफुटी आणि शासकीय परीक्षांमधील सातत्यपूर्ण गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडल्याचे अंधारे म्हणाल्या होत्या.
कामगार आयुक्तालयामार्फत माथाडी निरीक्षकांच्या ५९ जागांसाठी ही भरती राबवण्यात आली. यासाठी ११ जून रोजी अर्ज प्रक्रिया झाली, तर २९ आणि ३० जुलै रोजी तब्बल २३ हजार ५७४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. अंधारे यांच्या आरोपानंतर एमपीएससीनेही त्वरित स्पष्टीकरण देत ही भरती प्रक्रिया आयोगाकडून राबवली गेली नसल्याचे निवेदनाद्वारे जाहीर केले होते.
एमपीएससी आणि इतर शासकीय भरतीतील अनियमिततेचा मुद्दा मांडताना, विद्यार्थ्यांनी एस. जोशी पुलावर सलग १२ दिवस केलेल्या तीव्र आंदोलनाचा संदर्भही अंधारे यांनी दिला होता. आता भाजप आमदार पाचपुते यांनी केलेल्या या बोचऱ्या टीकेला सुषमा अंधारे काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाहीत’; पहिल्याच ऑडिशनला सोनाली कुलकर्णीला रंगावरून हिणवलं
- आंदोलनात सहभागी झाल्याने इमरान खानला देश सोडण्याची नोटीस, संजय राऊतांचा संताप; म्हणाले- अक्षय कुमारला का सांगत नाही?
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर; ट्रिस्टन स्टब्सला वगळले
Quick Answers
सुषमा अंधारे जाणीवपूर्वक खोटा नॅरेटिव्ह पसरवत असून त्यांचा पुन्हा एकदा अभ्यास कमी पडल्याची टीका आमदार विक्रम पाचपुते यांनी केली. तसेच शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा त्यांनी आधी अभ्यास करावा आणि दिशाभूल करणारी विधाने टाळावीत, असा सल्लाही त्यांनी दिला.
सुषमा अंधारे यांनी या भरती प्रक्रियेत मोठ्या गैरप्रकाराचा आरोप केला होता. नागपूरमधील एकाच परीक्षा केंद्रावरून तब्बल २४ विद्यार्थी टॉपर कसे आले, असा प्रश्न विचारत त्यांनी संपूर्ण निकालाच्या आणि भरती प्रक्रियेच्या चौकशीची मागणी केली होती.
संबंधित गट-क परीक्षा किंवा ही भरती प्रक्रिया आयोगाकडून राबवली गेली नसल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) प्रसिद्धीपत्रकाद्वारे/निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
कामगार आयुक्तालयामार्फत माथाडी निरीक्षकांच्या ५९ जागांसाठी ही भरती राबवण्यात आली होती आणि यासाठी २३ हजार ५७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








