दिल्ली, 11 ऑक्टोबर: दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुमारे २३ तासांनंतर रविवारी सकाळी १० वाजता सुटका झाल्यावर कॉकरोच जनता पक्षाच्या (सीजेपी) नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आम्हाला एक वर्ष शांतता भंग न करण्यास सांगितले जात आहे, मात्र प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार हेच शांतता भंग करण्याचे कृत्य करत आहेत, असा घणाघात सीजेपीचे नेते सौरव दास यांनी केला. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही पक्षाने दिला आहे.
सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका, अभिजीत दीपके आणि सौरव दास यांना सोडण्यात आले असून, विमानातून आपले अपहरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप रांका यांनी केला. सुटकेनंतर आजीच्या निधनामुळे अभिजीत दीपके महाराष्ट्रात आपल्या घरी परतले आहेत. दुसरीकडे, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू होते. या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले असून जवळपास १०० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सुटकेनंतर पत्रकार परिषद घेत रांका आणि दास यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देशात आणीबाणीसारखी परिस्थिती असून सरकार आपल्याच लोकांसोबत युद्ध करत असल्याचा दावा दास यांनी केला. तर, “नरेंद्र मोदींसारखा भ्याड पंतप्रधान आम्ही कधीही पाहिला नाही. गेल्या ७२ तासांत हजारो लोकांना ताब्यात घेऊन हुकूमशाहीचा नंगानाच सुरू आहे,” अशी टीका रांका यांनी केली. सीजेपीच्या कोणत्याही नेत्याने यापुढे आंदोलन न करण्याच्या बाँडवर स्वाक्षरी केलेली नाही. शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार असून त्याने शांतता भंग होत नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले.
आम्ही मागे हटणार नसून नागरिकांनी रस्त्यावर उतरावे, आम्हाला जिथे अडवले जाईल तिथे आम्ही आंदोलन करू, असे आवाहन दास यांनी केले. या आंदोलनाला पाठिंबा देत काल रस्त्यावर उतरल्याबद्दल अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, माणिक सरकार आणि पिनाराई विजयन या चार माजी मुख्यमंत्र्यांचे रांका यांनी आभार मानले. सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी भविष्यात एकजुटीने लढा देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, आजही सीजेपीच्या अनेक सदस्यांना आणि गेल्या काही दिवसांत एआयएसएफच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप रांका यांनी केला.
दरम्यान, सीजेपीच्या कायदेशीर विभाग प्रमुख रत्ना सिंह यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आंदोलकांवर कारवाई करण्याचे आदेश कोणी दिले, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. भाजपच्या सदस्यांना पोलिसांनी अडवले नाही, मात्र आंदोलनादरम्यान तरुणांना वाईट वागणूक देण्यात आली. तसेच, घरी परतल्यानंतरही सरकारी अधिकारी आपल्या घराबाहेर उभे होते, असा आरोपही रत्ना सिंह यांनी केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- हिवाळा सुरू होण्यापूर्वी घरातील वृद्धांची घ्या विशेष काळजी; ‘या’ महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या आहेत गरजेच्या
- नाना पाटेकरांची ती इच्छा अपूर्णच राहिली; अंत्यसंस्कारावेळी भावूक झालेल्या तुकाराम मुंढेंनी सांगितला शेवटचा प्रसंग
- प्रेमप्रकरणातून पळून जाणाऱ्या मुली आणि राजकारण्यांच्या वयाबाबत इंदुरीकर महाराजांचे मोठे विधान
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









