अंजनगाव, 11 ऑक्टोबर: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांनी प्रेमप्रकरणातून घरातून पळून जाणाऱ्या मुलींच्या वाढत्या प्रमाणावर भाष्य केले आहे. राज्यभरात मुलींच्या पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून, त्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत आहेत. मुलींच्या या प्रेमप्रकरणामुळे त्यांच्या पालकांची अत्यंत वाईट अवस्था होते, असे विधान त्यांनी केले. माढा तालुक्यातील अंजनगाव येथे आयोजित कीर्तनात ते बोलत होते.
याच कीर्तनादरम्यान त्यांनी राजकीय नेत्यांच्या वयाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. पुढाऱ्यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर थांबायला हवे आणि थेट राजीनामाच द्यायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. जसजसे वय वाढते तशी माणसाची बौद्धिक पातळी कमी होत असते, मात्र ‘पुढारी वय वाढलं तसं वेड्यासारखं करतात’, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या विधानावर राजकारणी नक्की काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंदुरीकर महाराज आणि वाद हे समीकरण अनेकदा पाहायला मिळते. यापूर्वी ते कीर्तनातून साध्या पद्धतीने लग्न करण्याबाबत आणि लग्नातील पैशांची उधळण रोखण्याबाबत कायम उपदेश करत असत. मात्र, स्वतःची मुलगी ज्ञानेश्वरी हिच्या साखरपुड्याला आणि लग्नाला त्यांना या गोष्टींचा विसर पडल्याचे पाहायला मिळाले होते.
त्यांच्या मुलीच्या लग्नाचा मंडप अनेक एकरांवर उभारण्यात आला होता, तसेच फुलांवरही लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. इतरांच्या मुलींना ‘गुड्डी’ म्हणत, आई-वडील त्यांना डोक्यावर कसे बसवून ठेवतात हे सांगणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या लेकीच्या हौसेसाठी ही उधळपट्टी केल्याने लोकांनी त्यांना चांगलेच सुनावले होते. आता मुलींच्या पळून जाण्यावरून केलेल्या या नव्या विधानामुळे इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- पोस्ट ऑफिस योजनांच्या नियमांत महत्त्वाचे बदल; PPF, सुकन्या समृद्धीसह अनेक योजनांवर होणार परिणाम
- भारतीयांना दुबईतील मुस्लिम आवडतात, मग पाकिस्तानी मुस्लिमांपासून लांब का राहतात? मिका सिंहचा सवाल
- लहान वयातच सांधेदुखीचा त्रास? जाणून घ्या कारणे आणि आहाराचे महत्त्व
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









