प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी राजकीय नेत्यांच्या निवृत्तीच्या वयावरून एक मोठे विधान केले आहे. माढा तालुक्यातील अंजनगाव येथे झालेल्या एका कीर्तनात बोलताना त्यांनी, पुढाऱ्यांनी वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त झाले पाहिजे, असे स्पष्ट मत मांडले आहे.
वाढत्या वयासोबत पुढाऱ्यांची बौद्धिक पातळी घसरत जाते, असे त्यांनी नमूद केले. आपल्या खास शैलीत यावर भाष्य करताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, “जसजसे वय वाढते, तसतसे पुढारी वेडे व्हायला लागतात.” त्यामुळे एका विशिष्ट वयानंतर थांबण्यातच खरी मजा असून, तसे केल्याने नेत्यांचा सन्मान आणि इज्जत टिकून राहते, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सत्तेला कायम चिकटून राहण्याच्या नेत्यांच्या वृत्तीवरही त्यांनी कीर्तनातून अप्रत्यक्षपणे प्रहार केला. ‘सगळी माझीच पाहिजे’ या मानसिकतेतून पुढाऱ्यांनी आता बाहेर पडणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. राज्याच्या सत्तेचा अवास्तव हव्यास न ठेवता योग्य वेळी पद सोडण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. इंदुरीकर महाराजांचे पुढाऱ्यांबद्दलचे हे थेट विधान सध्याच्या राजकीय वातावरणात तुफान चर्चेचा विषय ठरत आहे.






