Share

अट्टल चोरट्यांना अभय, विधीसंघर्षग्रस्त बालकांवर कारवाई? लामगव्हाण घरफोडीत नवा ट्विस्ट; पोलिसांच्या भूमिकेवर फिर्यादीचा संशय

लामगव्हाण घरफोडीत पोलिसांनी अल्पवयीन आरोपींना हजर करून सज्ञान संशयितांना परस्पर सोडून दिल्याने तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फिर्यादीने वरिष्ठांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Published On: 

Complaint application regarding Lamgavhan theft case and partial police action Bidkin police station Chhatrapati Sambhajinagar

पैठण | किरण काळे पाटील ( ढाकेफळ) –  लामगव्हाण येथील घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासाला आता नवे वळण मिळाले असून, पोलिसांच्या कारवाईवरच फिर्यादीने गंभीर संशय व्यक्त केला आहे. या गुन्ह्यात चार संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर, त्यापैकी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना (अल्पवयीन) न्यायपीठासमोर हजर करून बालसुधारगृहात पाठवण्यात आले. मात्र, त्याच वेळी ताब्यात घेतलेल्या दोन सज्ञान संशयितांना ‘गुन्ह्याशी संबंध नसल्याचे’ कारण देत तपासातून परस्पर बाजूला करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यामुळे या संपूर्ण कारवाईची निष्पक्ष चौकशी करून खरे आरोपी शोधावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

या प्रकरणी फिर्यादी प्रसाद संजय मिसाळ यांनी बिडकीन पोलीस ठाण्यासह थेट मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे रीतसर लेखी अर्ज सादर करून दाद मागितली आहे.

नेमकं प्रकरण काय?

फिर्यादी प्रसाद मिसाळ हे लामगव्हाणचे रहिवासी असून लोहगाव येथे मेडिकल चालवतात. वडिलांच्या उपचारासाठी संपूर्ण कुटुंब छत्रपती संभाजीनगर येथे राहत असताना, १५ ते १६ ऑगस्टच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या लामगव्हाण येथील बंद घराचे कुलूप तोडून तब्बल १ लाख ९८ हजार ६०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५११/२०२६ अन्वये गुन्हा दाखल आहे.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी १६ ऑगस्ट रोजी चार संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये विशाल विजय जाधव आणि दीपक काळे या दोन सज्ञान व्यक्तींसह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. मात्र, १८ ऑगस्ट रोजी तपास यंत्रणेने केवळ दोन अल्पवयीन मुलांनाच न्यायपीठासमोर हजर केले आणि सज्ञान संशयितांना तपासातून बाजूला केले.

बालकांच्या कथनामुळे संशयाला बळ!

फिर्यादीच्या अर्जानुसार, १८ ऑगस्ट रोजी मा. न्यायाधीश श्रीमती पी. पालवे यांच्यासमोर अल्पवयीन आरोपींना हजर केले असता, त्यांनी “मित्रांच्या नादी लागून हे कृत्य केले” अशी स्पष्ट कबुली दिली आहे. यावेळी आपण स्वतः आणि वकील ॲड. शंकर अदावले पाटील न्यायालयात प्रत्यक्ष हजर होतो, असे फिर्यादीने अर्जात नमूद केले आहे.

या अल्पवयीन मुलांकडे थेट ‘बनावट ओळखपत्र’ मिळून येणे आणि त्यांनी ‘मित्रांच्या सांगण्यावरून’ गुन्हा केल्याचे कबूल करणे, या बाबींची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. सज्ञान व्यक्तींनी या बालकांचा वापर करून घरफोडी घडवून आणली का? तसेच चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या प्रक्रियेत नेमकी कोणाची काय भूमिका होती? याचा सखोल तपास व्हावा, असा दावा फिर्यादीने केला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी

बिडकीन पोलिसांनी २४ तासांत गुन्हा उघडकीस आणल्याचा दावा केला असला तरी, तपासातील या त्रुटी आणि सज्ञान आरोपींना दिलेली सूट संशय निर्माण करणारी आहे. त्यामुळे विशाल जाधव आणि दीपक काळे यांचा या घरफोडीतील सहभाग निष्पक्षपणे तपासावा आणि पुरावे आढळल्यास त्यांना ‘सहआरोपी’ करावे. तसेच, हा तपास कोणत्याही दबावाशिवाय पारदर्शक पद्धतीने व्हावा, अशी मागणी फिर्यादी मिसाळ यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही