मुंबई : मुंबईच्या महापौर (Mayor) रितू तावडे (Ritu Tawade) यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महापौरांच्या बंगल्याच्या कामासाठी २.८९ कोटी रुपयांची निविदा (टेंडर) काढल्याची चर्चा होती. आता महापौरांनी मुंबई महानगरपालिकेची ही वादग्रस्त निविदा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. “हे काम प्रत्यक्षात राणी बागसाठी होते, परंतु तपशीलामध्ये चुकून महापौरांच्या बंगल्याचा उल्लेख झाला. या गोंधळामुळे मी निविदा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत,” असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
निविदेच्या शीर्षकामुळे “हेरिटेज बंगल्याचे नूतनीकरण” (Upgradation of Heritage Bungalow) हा वाद निर्माण झाला होता. यामुळे हे काम महापौरांच्या बंगल्यासाठी आहे की प्राणीसंग्रहालयासाठी, याबाबत संभ्रम निर्माण झाला. वारंवार विचारलेल्या प्रश्नांनंतर महापौरांनी ही चूक मान्य केली. या प्रकल्पात ‘साउंड बॅरियर्स’ बसवण्याचा समावेश होता. “संपूर्ण प्रकल्प प्राणीसंग्रहालयासाठी होता, परंतु महापौरांच्या बंगल्याशी जोडून चुकीचा प्रचार केला गेला,” असे तावडे म्हणाल्या.
Kishori Pednekar Mayor bungalow tender controversy
“विरोधकांकडे आता कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत. किशोरी पेडणेकर यांना रात्रंदिवस सर्व गोष्टींमध्ये महापौरच दिसतात. आदित्य ठाकरे यांनीही याबद्दल ट्विट केले होते. काही बोलण्यापूर्वी त्यांनी योग्य ती माहिती घ्यायला हवी होती. मला आदित्य ठाकरे यांच्या बुद्धिमत्तेची खरोखरच किव येते. गेल्या २५ वर्षांत त्यांनी केलेल्या घोटाळ्यांची दुरुस्ती करण्याचे काम आम्ही करत आहोत,” अशी टिप्पणी रितू तावडे यांनी केली.
“महापौरांच्या बंगल्यावर अतिरिक्त निधी खर्च केला जात असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. महापौर बंगला हेरिटेजकडे येतो. ही टेंडर प्रोसेस बंगल्याच्या अख्त्यारीत येत नाही. महापौर नाव जोडलं की मायलेज त्यांना मिळतो. ‘उबाठा’ गट केवळ एक राजकीय कारस्थान चालवत आहे. २.८९ कोटी रुपयांची निविदा प्राणीसंग्रहालय विभागाने राणी बागेसाठी काढली होती, हेरिटेज विभागाने नाही,” असेही त्या म्हणाल्या.
किशोरी पेडणेकर यांची टीका
“मी स्वतः ती निविदा वाचत आहे, त्यात ‘हेरिटेज बंगला’ असा उल्लेख आहे. त्या बंगल्याजवळ यापूर्वीच अनेक बांधकामे झाली आहेत. अधिकारी अशा चुका कशा करू शकतात? महापौरांना अडचणीत कोण आणत आहे? महापौरांच्या बंगल्याजवळ बॅरिकेड्स लावले जातात. बॅरिकेडिंगची संकल्पना चांगली आहे. तरी प्राणी बंगल्यापासून बऱ्याच अंतरावर आहे. निविदा रद्द करण्याची तुमची बालबुद्धी दिसते,” अशी टीका किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदेंचे मोठे आदेश; सिद्धिविनायक मंदिराच्या देणग्यांचे विशेष ऑडिट होणार
- Nitin Gadkari: मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, डीपफेक व्हिडिओ हटवण्याचे आदेश
- ‘गुंगी गुडिया’ वाद पेटला! मंत्रालयासमोर NCP आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












