🕒 1 min read
१२० कोटींचा गल्ला जमवून इतिहास रचणाऱ्या सिनेमाच्या सक्सेस पार्टीत असं नेमकं काय घडलं, ज्यामुळे दिग्दर्शक रितेश देशमुखला (Riteish Deshmukh Video) थेट जाहीर माफी मागावी लागली?
१ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाने (Raja Shivaji Movie) बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पण या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या पार्टीतला रितेशचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण करतोय.
Riteish Deshmukh Video
या व्हिडीओमध्ये रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला टी-शर्ट घालून डान्स केल्याचं दिसलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. दुसरीकडे, काही लोकांनी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचाही आरोप केला. वाढता वाद पाहून अखेर रितेशने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित आपली बाजू स्पष्ट केली आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत रितेशने सांगितलं की, राजा शिवाजीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण टीमने छोटी पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी प्रचारादरम्यान वापरलेला महाराजांची प्रतिमा असलेला टी-शर्ट त्याने घातला होता. वेळ न मिळाल्याने तो बदलता आला नाही. महाराजांचा अवमान करण्याचा आपला किंचितही हेतू नव्हता, असं त्याने स्पष्ट केलंय.
दारू पिऊन डान्स केल्याच्या आरोपांवर त्याने कडक शब्दांत उत्तर दिलंय. “मी आजवर कधीही मद्यपान केलेलं नाही आणि भविष्यातही करणार नाही. त्यामुळे हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत,” असं तो म्हणाला. विशेष म्हणजे, ज्याने हा व्हिडीओ काढला त्याला या पार्टीचं निमंत्रणच नव्हतं, अशी माहितीही रितेशने दिली आहे.
साडेतीन वर्षांच्या मेहनतीनंतर पडद्यामागील सर्व कलाकारांचे आभार मानण्यासाठी ही पार्टी होती. तरीही या कृतीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर एक शिवप्रेमी म्हणून मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, असं त्याने नमूद केलंय. ‘राजा शिवाजी’ हा मराठीत सर्वाधिक कमाई करणारा पहिला सिनेमा ठरला असून यात जिनिलिया, विद्या बालन, अभिषेक बच्चन यांसारख्या तगड्या स्टारकास्टची फौज आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गरोदर महिलांच्या बँक खात्यात थेट येणार ५००० रुपये; जाणून घ्या घरबसल्या अर्ज करण्याची सोपी पद्धत!
- अशोक सराफांसोबत छगन भुजबळांनी केले होते दोन सिनेमे; ‘मामांच्या’ वाढदिवशी छगन भुजबळांची खास पोस्ट
- मान्सून केरळात दाखल; महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री कधी? हवामान विभागाची मोठी अपडेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












