मुंबई : टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर भारतीय संघात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. क्रिकेटमध्ये एका संधीसाठी खेळाडू आयुष्य पणाला लावतात, आणि इथे कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) प्रयोग थांबवायला तयार नाही. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपपूर्वी नवी मुंबईत सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA Practice Match) मध्ये जे घडलं, त्याने निवड समितीलाही विचार करायला भाग पाडलं असेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संजू सॅमसनला (Sanju Samson) अभिषेक शर्मासोबत ओपनिंगची संधी मिळाली होती, पण बॅट शांतच राहिली. या अपयशाची किंमत त्याला मोजावी लागली. कर्णधार सूर्याने धाडसी निर्णय घेत सराव सामन्यात संजूला ओपनिंगवरून हटवलं आणि तिथे एन्ट्री झाली ती ईशान किशनची (Ishan Kishan)! मिळालेल्या संधीचं नुसतं सोनं नाही, तर ईशानने हिरे लुटले आहेत असंच म्हणावं लागेल.
IND vs SA Practice Match
ईशान किशनने मैदानावर पाऊल ठेवताच आफ्रिकन गोलंदाजांची पिसं काढली. त्याने अवघ्या २० चेंडूत ५३ धावा कुटल्या. यात तब्बल ७ उत्तुंग षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. याला म्हणतात संधीचं सोनं करणं! ईशान आणि अभिषेक शर्मा (२४ धावा) या दोघांनाही नंतर मुद्दाम ‘रिटायर्ड आऊट’ करण्यात आलं, जेणेकरून इतरांना संधी मिळेल.
दुसरीकडे, दुखापतीमुळे टीमबाहेर असलेल्या तिलक वर्माने (Tilak Varma) देखील दणक्यात पुनरागमन केलंय. त्याने आज ४५ धावांची खेळी करत आपण ‘मॅच फिट’ असल्याचं सिद्ध केलं.
सूर्याचे हे प्रयोग पाहून एक गोष्ट स्पष्ट होतेय, वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची ‘बेंच स्ट्रेंथ’ टेस्ट केली जातेय. पण ईशानच्या या वादळी खेळीने संजू सॅमसनचं ओपनिंगचं तिकीट कापलं गेलंय का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- सोनम कपूरचा ‘तो’ लूक पाहून नेटकरी चक्रावले; भररस्त्यात फ्लाँट केला बेबी बंप
- सोन्याच्या भावात वाढ; एका दिवसात चांदी १० हजारांनी महागली, सोन्यानेही ओलांडली सीमा!
- ‘लाडकी बहीण’ योजनेचं नाव बदलणार? अजितदादांच्या नावाची मागणी होताच फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!













