🕒 1 min read
मुंबई – वयाच्या पंधराव्या वर्षी मुलं दहावीच्या बोर्डाच्या टेन्शनमध्ये असतात, पण याच वयात एका पठ्ठ्याने थेट आयपीएलच्या मैदानावर भल्याभल्या गोलंदाजांचा घाम काढलाय! राजस्थान रॉयल्सकडून खेळताना अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने या हंगामात असं काही चक्रीवादळ आणलं की थेट ‘ऑरेंज कॅप’वरच स्वतःचं नाव कोरलं. रविवारी अहमदाबादमध्ये ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’चा पुरस्कार स्वीकारताना या पोराने जे काही सांगितलं, ते ऐकून सुनील गावस्करांसारखे दिग्गजही थक्क झाले.
या पोराची आकडेवारी पाहिली तर भल्याभल्यांचे डोळे विस्फारतील. अवघ्या १६ डावांत तब्बल २३७.३० च्या अफाट स्ट्राईक रेटने वैभवने ७७६ धावा कुटल्यात. यात एक धडाकेबाज शतक आणि पाच अर्धशतकं आहेत. विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक त्याचं अवघ्या एका चेंडूने हुकलं.
Vaibhav Suryavanshi IPL Orange Cap winner
‘प्रत्येक मॅचमध्ये तुम्ही एकाच गियरमध्ये बॅटिंग करू शकत नाही, परिस्थितीनुसार खेळ बदलावा लागतो’, असं वैभव सांगतो. गुजरातविरुद्धच्या ‘क्वालिफायर २’ सामन्यात हेच पाहायला मिळालं. सुरुवातीलाच दोन विकेट्स गेल्यावर त्याने रवींद्र जडेजाला सोबत घेत डाव सावरला. स्वतःच्या नैसर्गिक आक्रमकतेला थोडी मुरड घालत त्याने ४७ चेंडूत ९६ धावांची जबरदस्त खेळी केली. दुर्दैवाने तो राजस्थानला फायनलमध्ये पोहोचवू शकला नाही, याची खंतही त्याने बोलून दाखवली.
मैदानावर उत्तुंग षटकार मारण्याचं रहस्य काय? असं विचारल्यावर तो हसत म्हणाला, “मी माझ्या नॅचरल गेमवर विश्वास ठेवतो. बॉल टप्प्यात आला की मी पूर्ण ताकदीने फटका मारतो. आणि सर, मी आता काय दूध पीत नाही!” त्याच्या या मिश्कील उत्तरावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
क्रिकेटच्या मैदानावर लांबची इनिंग खेळायची असेल तर फिटनेसला पर्याय नाही, याची पक्की जाणीव वैभवला आहे. देशासाठी आणि फ्रँचायझीसाठी दीर्घकाळ खेळायचंय, त्यामुळे दुखापतींपासून दूर राहणं गरजेचं असल्याचं तो आवर्जून सांगतो. राजस्थान रॉयल्सच्या ड्रेसिंग रूममधल्या वातावरणाचंही त्याने तोंडभरून कौतुक केलं. सीनियर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या पाठिंब्यामुळे रोज काहीतरी नवं शिकायला मिळत असल्याचे त्याने सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, लाडकी बहीण योजनेतून तब्बल सव्वा कोटी महिला बाहेर?
- धनंजय मुंडेंकडून भररस्त्यात गोळीबार? धनंजय देशमुखांच्या आरोपाने राजकारणात मोठी खळबळ!
- म्हाडाच्या घरांसाठी मुंबईकरांच्या तुफान प्रतिसाद, पण लॉटरीची तारीख का रखडली?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












