Supriya Sule vs Jyoti Waghmare: राजकारणात दुसऱ्याच्या घरात डोकावण्याची सवय कधीकधी चांगलीच अंगलट येते. आता हेच बघा ना, शिवसेना नेमकी कोणाची? यावरून पुन्हा एकदा मोठा राजकीय भडका उडालाय.
‘शिवसेना ठाकरेंचीच होती, आहे आणि राहील’, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पण त्यांचं हे वक्तव्य शिंदे गटाच्या चांगलंच जिव्हारी लागलंय. त्यामुळेच खासदार ज्योती वाघमारे यांनी सुळेंवर थेट आणि घणाघाती हल्लाबोल केला आहे.
‘आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून’, अशी बोचरी टीका वाघमारे यांनी केली. स्वतःचा पक्ष सांभाळता येत नाही आणि हे चाललेत इतरांना शहाणपणा शिकवायला? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
सुप्रियाताई, तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहात. तुम्हाला सगळं आयतं मिळालंय. यात तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय? असा जळजळीत प्रश्न वाघमारेंनी विचारला. घराणेशाहीतून आलेली लोकं फक्त घराणेशाहीचंच समर्थन करतात, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना वाघमारेंनी सुळेंना खडेबोल सुनावले. शिंदेंनी स्वतःचं नेतृत्व स्वतःच्या हिमतीवर उभं केलंय. शिवसेना कोणाची, याचा निकाल निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि थेट जनतेच्या न्यायालयानेही दिलाय, याची आठवण त्यांनी करून दिली.
त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदम सुरक्षित आहे, असा ठाम विश्वास वाघमारे यांनी व्यक्त केला. हा देश घराणेशाहीवर नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो, हेही त्यांनी सुळेंना ठणकावून सांगितलं. सुप्रियाताई, तुम्ही आधी तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “बावनकुळे साहेब, मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून रडकुंडीला आलात” : मनोज जरांगे
- परदेशात भारतीय सुरक्षित नाहीत? ५ वर्षांत हल्ले तब्बल ७ पटीने वाढले; केंद्र सरकारचा राज्यसभेत मोठा खुलासा
- AI च्या वादळात भारतीयांच्या नोकऱ्या सुरक्षित आहेत का? ‘गोल्डमन सॅक्स’च्या अहवालातून समोर आलं मोठं सत्य
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









