कोल्हापूर, 23 ऑक्टोबर: पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या २०२६ च्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळी कोल्हापुरातील मतदान केंद्रांच्या बाहेर उभारलेल्या बुथना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मतदानासाठी आलेल्या मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले आणि महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा नक्की विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला.
माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवार देण्यात आला असला तरी, त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, रवींद्र धंगेकर यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, महायुती म्हणून एकत्र काम करताना माझ्यासह सर्वच नेत्यांनी जपून बोलले पाहिजे, अशी सावध प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपबाबतही चंद्रकांत पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे. ही ऑडिओ क्लिप एआयच्या (AI) माध्यमातून तयार केली असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. तसेच, अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिपची पूर्ण खात्री केल्याशिवाय महायुतीमधील कोणत्याही नेत्यांनी घाईघाईने प्रतिक्रिया देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या निवडणुकीत पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे सचिन सानप, काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजपचे कौस्तुभ गावडे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तर, पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांना शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांचे थेट आव्हान आहे. पदवीधर मतदारसंघासाठी ४७ तर शिक्षक मतदारसंघासाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये मिळून या निवडणुकीसाठी एकूण १,०५१ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, ४ लाख ४९ हजार ९५९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. यापैकी पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ३ लाख ८८ हजार १९ मतदार असून त्यांच्यासाठी ७४१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर शिक्षक मतदारसंघासाठी ६१ हजार ९४० मतदार असून ३१० मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.
पदवीधर मतदारसंघाची जिल्हानिहाय आकडेवारी पाहता, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख १४ हजार ५६२ मतदार (२१२ केंद्रे) आहेत. त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात ८८ हजार २०२ मतदार (१६० केंद्रे), सांगलीत ८८ हजार ७० मतदार (१५९ केंद्रे), सोलापुरात ४९ हजार ०७२ मतदार (११७ केंद्रे) आणि सातारा जिल्ह्यात ४७ हजार ४६३ मतदार (९३ केंद्रे) आहेत.
शिक्षक मतदारसंघाच्या जिल्हानिहाय मतदारांमध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजार ८२२ मतदार असून तिथे ७२ मतदान केंद्रे आहेत. सोलापूरमध्ये १५ हजार ३०३ मतदार (७६ केंद्रे), कोल्हापूरमध्ये १२ हजार २९९ मतदार (७० केंद्रे), साताऱ्यात ९ हजार ४५४ मतदार (४४ केंद्रे) आणि सांगली जिल्ह्यात ८ हजार ६२ मतदार (४८ केंद्रे) मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर संजू सॅमसनचे सोशल मीडियावरील टीकेबाबत मोठे विधान
- दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, दुसऱ्या कसोटीनंतर कशी आहे ‘WTC’ गुणतालिका?
- अभिषेक शर्माने मोडला रोहित शर्माचा विक्रम, टी-२० पॉवरप्लेमध्ये मारले सर्वाधिक षटकार
Quick Answers
चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार, ही ऑडिओ क्लिप एआयच्या (AI) माध्यमातून तयार केलेली असण्याची शक्यता आहे. तसेच, या ऑडिओ क्लिपची पूर्ण खात्री केल्याशिवाय महायुतीमधील कोणत्याही नेत्यांनी घाईघाईने प्रतिक्रिया देऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले.
या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघासाठी ४७ तर शिक्षक मतदारसंघासाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव आणि शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात थेट लढत होत आहे.
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण १,०५१ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, ४ लाख ४९ हजार ९५९ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








