🕒 1 min read
मीरा-भाईंदर : आगामी महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागताच मुंबई आणि उपनगरांमध्ये ‘मराठी विरुद्ध उत्तर भारतीय’ हा जुना वाद पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौराच्या वक्तव्यावरून रान पेटल्यानंतर भाजपचे जेष्ठ नेते कृपाशंकर सिंह ( Kripashankar Singh ) यांनी आता सावध भूमिका घेतली आहे. “मराठी केवळ भाषा नाही, तर ती आमची संस्कृती आहे,” असं सांगत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे, मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच असायला हवा, अशी स्पष्ट ग्वाही देत त्यांनी विरोधकांच्या हातातलं आयतं कोलीत काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय समाजाचा एक मेळावा पार पडला. या कार्यक्रमात उपस्थितांनी “आमचा महापौर कधी होणार?” असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना कृपाशंकर सिंह यांनी, “तुम्हाला तुमचा महापौर हवा असेल, तर आधी संख्याबळ वाढवा, जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणा,” असा सल्ला दिला होता.
त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरला. यावरून ठाकरे गट आणि मनसेने भाजपला धारेवर धरले. भाजपला मराठी माणसाच्या हक्कांपेक्षा परप्रांतीयांचे लाड करण्यात जास्त रस असल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं.
BJP leader Kripashankar Singh U-Turn
“माझ्या मराठी प्रेमाची परीक्षा घेऊ नका” वाद चिघळत असल्याचे लक्षात येताच कृपाशंकर सिंह यांनी तातडीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, “मी महाराष्ट्राच्या मातीत आलो आणि याच मातीने मला मोठं केलं. मराठी भाषेबद्दल आणि संस्कृतीबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. कदाचित माझे मराठी व्याकरण चुकलं असेल, पण माझी भावना शुद्ध आहे. माझ्या मराठी प्रेमाची कुणीही परीक्षा घेऊ नये.”
संजय राऊतांवर निशाणा आणि पक्षाची भूमिका विरोधकांवर, विशेषतः संजय राऊतांवर टीका करताना सिंह ( Kripashankar Singh ) म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की काहींना मुद्दाम प्रांतीयवाद आठवतो. माझा व्हिडीओ अर्धा-अधूरा व्हायरल करून समाजात विष कालवण्याचे काम सुरू आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पूर्वीच्या विधानावरून त्यांनी पूर्णपणे यू-टर्न घेत म्हटलं की, “लोकांच्या भावनेला मी लोकशाहीतील आकड्यांचे उत्तर दिले होते. पण पक्षाची भूमिका ही वैयक्तिक मतापेक्षा मोठी असते. मुंबईचा महापौर हा मराठीच आणि हिंदूच असायला हवा, ही आमची ठाम भूमिका आहे.”
राजकीय कोलांटीउडी की डॅमेज कंट्रोल?
मीरा-भाईंदर पट्ट्यात मराठी आणि उत्तर भारतीय दोन्ही मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे एका बाजूला ‘संख्याबळ वाढवा’ म्हणत उत्तर भारतीयांना चुचकारायचं आणि दुसरीकडे ‘मराठी हीच संस्कृती’ म्हणत मराठी मतदारांचा रोष टाळायचा, अशी दुहेरी कसरत सध्या कृपाशंकर सिंह ( Kripashankar Singh ) करताना दिसत आहेत. महायुतीचे नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील, असं सांगत त्यांनी आता चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात टोलवला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “भाऊ, असं नका करू…” संजय शिरसाटांच्या दारात महिलेने फोडला हंबरडा! शिरसाटांच्या दारात महिला कोसळली..
- तिकीट कापल्याचा भडका! भागवत कराडांच्या डोळ्यादेखत भाजप महिला कार्यकर्तीने नेत्याच्या कानशिलात लगावली
- “संभाजीनगरात राडा! “तू हरामी, हरामखोर आहेस…” भागवत कराडांना महिलेची अर्वाच्य भाषेत शिवीगाळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











