🕒 1 min read
प्रतिनिधी – क्रिकेटच्या मैदानात कधी काय होईल सांगता येत नाही, पण जेव्हा ‘कुंग फू पांड्या’ फॉर्ममध्ये असतो, तेव्हा गोलंदाजांची खैर नसते! याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. ६, ६, ६, ६, ६, ४… हे आकडे एखाद्या लॉटरीचे नाहीत, तर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) एकाच ओव्हरमध्ये कुटलेल्या धावांचे आहेत! विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोद्याकडून खेळताना हार्दिकने विदर्भाच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली आणि आपल्या कारकिर्दीतील पहिले ‘लिस्ट ए’ शतक झळकावले.
Hardik Pandya Century in just 68 balls
राजकोटच्या मैदानावर हार्दिकने सुरुवातीला संयमी खेळ केला. ४४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पण त्यानंतर त्याने अचानक गिअर बदलला. ३८ व्या षटकापर्यंत ६६ धावांवर असलेल्या हार्दिकने ३९ व्या षटकात गोलंदाजावर असा हल्लाबोल केला की पाहणारे बघतच राहिले. सलग ५ षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत त्याने एकाच षटकात तब्बल ३४ धावा वसूल केल्या. अवघ्या ६८ चेंडूंत शतक पूर्ण करत त्याने निवड समितीला कडक सलामी ठोकली आहे.
एवढा भन्नाट फॉर्म असूनही हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत दिसणार नाही, अशी चर्चा आहे. ‘क्रिकबझ’च्या रिपोर्टनुसार, आगामी टी-२० वर्ल्ड कप २०२६ लक्षात घेऊन हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. ११ जानेवारीपासून वडोदरा येथे ही मालिका सुरू होत आहे. म्हणजे घरच्या मैदानावर मालिका असूनही बडोद्याचा हा ‘हिरो’ मैदानात नसेल, ही चाहत्यांसाठी नक्कीच नाराजीची गोष्ट आहे.
हार्दिकने या खेळीत ८ उत्तुंग षटकार आणि ६ चौकार लगावले. त्याने एकहाती किल्ला लढवत बडोद्याला (Vijay Hazare Trophy 2026 ) सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. आता विश्रांतीनंतर ‘हार्दिक २.०’ कसा धमाका करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- “तुमच्यात हिंमत आणि मर्दानगी असेल तर…”; ठाण्याच्या ‘त्या’ व्हिडिओवरून राऊतांचे शिंदेंना ओपन चॅलेंज!
- रात्री ‘अपक्ष’, सकाळी ‘राष्ट्रवादी’ची! पिंपरी-चिंचवडमध्ये घडला चमत्कार; गहाळ झालेला एबी फॉर्म नक्की सापडला कुठे?
- उद्धव ठाकरे समोर येताच राडा; ‘इंजिन’ अन् ‘धनुष्यबाण’ भिडले! बोरिवलीत नेमकं काय घडलं?













