प्रतिनिधी, २५ नोव्हेंबर: पुण्यातील गुन्हेगारीचे वास्तव मांडणाऱ्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटालाही मागे टाकेल अशी थरारक घटना समोर आली आहे. खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेल्या मंदार किवळे याच्यावर भररस्त्यात गोळीबार करून आणि कोयत्याने २० पेक्षा जास्त वार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. अवघ्या ४ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटला होता.
मंदार हा शुभम चव्हाण खून प्रकरणात न्यायालयातील सुनावणीसाठी आला होता. मंदारला त्याच्या वकिलांनी सांगितले की, “त्याच तारखेच्या कामासाठी आज तो न्यायालयात आला होता. न्यायालयीन कामकाज पूर्ण झाल्यानंतर आता तू घरी जाऊ शकतोस, आपले आजचे काम झाले आहे.” यानंतर मंदार गेट क्रमांक ४ जवळ पोहोचला, जिथे मयत शुभमचा भाऊ आणि त्याचे साथीदार दबा धरून बसले होते.
अक्षय चव्हाण याच्यासह बाब्या पवार, यणप्पा, रोहन कानगुडे, गणेश चव्हाण, अमोल रामचंद्र चव्हाण आणि गणेश सुभाष चव्हाण असे ७ जण दोन स्कुटरवरून तिथे आले. त्यांनी मंदारवर आधी गोळीबार केला आणि नंतर कोयत्याने २० हून अधिक वार केले. मंदारने हे वार हातावर झेलल्याने त्याचा पंजा छाटला गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंदारला सोडून हल्लेखोर पसार झाले. त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यामागे शुभम चव्हाण खून प्रकरणाची पार्श्वभूमी आहे. २० एप्रिल २०२५ रोजी कात्रज परिसरातील संतोषनगर येथे जमिनीच्या वादातून मुख्य आरोपी अमर दिलीप साकोरे (वय ४०) आणि मंदार किवळे यांनी साथीदारांसह शुभमला अडवून बेदम मारहाण केली होती. लाकडी बांबू आणि स्टंपने मारहाण करून तसेच डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
या घटनेनंतर आंबेगाव पोलिसांनी अमर साकोरे, मंदार किवळे, गिरीश सुभाष बाबरे (वय २५) आणि योगेश बाबुराव ढोरे (वय ३५) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने कामठी बु. येथे छापा टाकून त्यांना अटक केली होती. दीड वर्ष येरवडा तुरुंगात राहिल्यानंतर मंदार जामिनावर बाहेर आला होता. आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अक्षय चव्हाणने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे.







