शरद पवार, सुप्रिया सुळे भाजपचा अजेंडा पुढे नेतायत, तरीही बी-टीम नाही?; अंजली आंबेडकरांचा संताप

डिलिमिटेशन विधेयकावरून अंजली आंबेडकर यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर निशाणा साधत पुरोगामी कार्यकर्त्यांच्या दुटप्पीपणावर सडकून टीका केली आहे.

Published On: 

Anjali Ambedkar criticizes Sharad Pawar and Supriya Sule

प्रतिनिधी, 24 नोव्हेंबर: आगामी हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारकडून सादर केल्या जाणाऱ्या डिलिमिटेशन (परिसीमन) विधेयकावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच, वंचित बहुजन आघाडीच्या अंजली प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या विधेयकाबाबत शरद पवार गटाच्या भूमिकेवर संभ्रम असल्याने अंजली आंबेडकर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे तीव्र संताप व्यक्त केला आहे.

केंद्रातील मोदी सरकार आगामी हिवाळी अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण सुधारणा विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. या विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, विधेयक हाती आल्यानंतरच आपण भूमिका स्पष्ट करू, असे सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेस पक्ष उघडपणे या विधेयकावर आपली भूमिका घेत असताना, राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावरून अंजली आंबेडकरांनी कडाडून टीका केली आहे.

आपल्या सविस्तर पोस्टमध्ये अंजली आंबेडकर यांनी उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि ‘निर्भय बनो’ मोहिमेतील कार्यकर्त्यांच्या दुटप्पीपणावरही निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडी जेव्हा स्वतंत्रपणे निवडणूक लढवते, तेव्हा हे लोक तिला भाजपची ‘बी-टीम’ ठरवण्यासाठी तत्पर असतात. मात्र, शरद पवार आणि सुप्रिया सुळे जेव्हा उघडपणे भाजपच्या राजकीय अजेंड्याला मदत करत आहेत, तेव्हा अचानक या सर्वांचे आवाज का बंद झाले आहेत? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

२०२४ च्या निवडणुकीत प्रबळ जातींच्या पक्षांचा प्रचार करणाऱ्यांनी आता जाणीवपूर्वक मौन बाळगले असून, हा त्यांचा बौद्धिक अप्रामाणिकपणा आणि राजकीय सोयीनुसार केलेला ‘निवडक संताप’ असल्याचे अंजली आंबेडकर यांनी म्हटले आहे. बहुजनांच्या राजकीय अस्मितेवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे हे लोक, भाजपचा अजेंडा मजबूत करणाऱ्या सवर्ण राजकीय पक्षांबाबत मात्र कमालीची उदार भूमिका घेतात, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपचे प्रस्तावित डिलिमिटेशन विधेयक हे ‘SIR’ पेक्षाही अधिक धोकादायक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या विधेयकामुळे संसदेत उत्तर भारतीय राज्यांचे प्रतिनिधित्व असमान पद्धतीने वाढेल, ज्यामुळे देशाचा संघराज्यीय समतोल मूलभूतपणे बिघडू शकतो. सत्तेचे केंद्रीकरण एका विशिष्ट प्रादेशिक गटाकडे होऊन समान प्रतिनिधित्वाच्या लोकशाही तत्त्वाला बाधा पोहोचेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेणाऱ्या प्रक्रियेला मदत करत असल्याचा थेट आरोप करत, त्यांना कुणीही भाजपची बी-टीम का म्हणत नाही? असा प्रश्न अंजली आंबेडकरांनी विचारला आहे. पुरोगामी आणि स्त्रीवादी लोकांचे हे मौन केवळ जातीवर आधारित असून, भाजपला पोटतिडकीने विरोध करणाऱ्या फुले-आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तुम्ही सर्वजण विकले गेला आहात असे गृहीत धरावे का, असा घणाघातही त्यांनी शेवटी केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही