प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून हा सरकारचा पूर्णपणे नाकर्तेपणा असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. सत्ताधारीच शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत असल्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्वतः याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. सध्या आलेले हे संकटही निघून जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नयेत, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
कर्जवसुलीसाठी येणाऱ्या फायनान्स कंपन्यांबाबत जरांगे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. फायनान्सवाल्यांना थेट पैसे देणार नाही असे सांगा, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना उद्देशून ते म्हणाले की, “त्याच्या डोक्यात दगड घालायचा. पण आपण आपलं जीवन संपवायचं नाही.” फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली जाते, याकडे लक्ष वेधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही थेट निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकारांमध्ये प्रत्यक्ष लक्ष घातले पाहिजे, केवळ भाषणातून कर्जवसुली न करण्याच्या वल्गना करून चालणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडेच असताना रोज शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कर्जवसुलीसाठी जर कोणी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला, तर सर्व गावकऱ्यांनी मिळून त्याला गावाबाहेर हुसकावून लावले पाहिजे. फायनान्सवाल्यांना गावकऱ्यांनी गावबंदीच केली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
हिवाळी अधिवेशनावर भाष्य करताना जरांगे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. मंत्र्यांना वास येऊ नये म्हणून तिथे नवीन पडदे बसवले गेले आहेत आणि इकडे लोकांवर मरायची वेळ आली आहे, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. सर्वसामान्यांना यातून काहीच मिळणार नसून नुसत्या घोषणा होतील. राजकारण्यांकडून शिकण्यासारखे आहे; कालचे कट्टर विरोधक आता एकाच बंगल्यात बसत आहेत आणि आपण मात्र त्यांच्यासाठी एकमेकांवर दगडफेक करत आहोत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
‘अजित पवार अपघात प्रकरणा’बाबत विचारले असता, कुटुंबाचे मत असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशीच झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. यावर आपण शंका घेऊ शकत नाही आणि थेट हो किंवा नाहीही म्हणू शकत नाही, पण आपला माणूस गेला असून तो माघारी येणार नाही हे सत्य असल्याचे ते म्हणाले. तसेच ५०० कोटींच्या रेकॉर्डिंग बॉम्ब प्रकरणातील सर्व लोक भाजपचे असल्याचा दावा त्यांनी केला. हे एक भयानक कोडे असून याचा कधीही तपास होणार नाही, कारण तपास करायचा असता तर आतापर्यंत पाच-सहा जणांवर गुन्हे दाखल झाले असते. या प्रकरणात आधी नेमलेली एसआयटी केवळ स्वतःच्या लोकांना सोडण्यासाठीच होती, असा आरोपही जरांगे यांनी केला.
आपल्या विरोधात बोलण्यासाठी जाणीवपूर्वक एक मोहीमच सुरू असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. ‘जरांगे पाटलांच्या विरोधात बोला आणि पैसे कमवा’, असे अभियानच सध्या सुरू असून, आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना कणाकणाने पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘माझा आवडता खेळाडू’: आयपीएल निवृत्तीनंतर जसप्रीत बुमराहने महेंद्रसिंह धोनीला मानले आदर्श
- बाळासाहेबांचा फोटो फाटलाच नाही; मणिशंकर अय्यर यांचं तोंड फाटलं, एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
- मनोज जरांगे पाटलांचा नवा गौप्यस्फोट: ‘विरोधकांना पैसे वाटले जात आहेत, पुरावे थेट फडणवीसांना देणार’








