प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: पुण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात तीव्र आंदोलन केले. शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्या शायना एनसी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी हा संताप व्यक्त केला. या घटनेचा निषेध म्हणून ठाकरे गटाने एकनाथ शिंदे आणि शायना एनसी यांचे पोस्टर फाडून पायदळी तुडवले. त्यानंतर या फाडलेल्या पोस्टरचे थेट मुठा नदीत विसर्जन करण्यात आले.
या वादाची मूळ सुरुवात मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेतून झाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी सोनिया गांधी लिखित ‘बिलॉन्गिंग- अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाविरोधात जोरदार रान उठवण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले होते. या पुस्तकातील मजकूर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून प्रवक्त्यांनी सर्वांसमक्ष पुस्तकातील काही पाने फाडली.
याच आंदोलनादरम्यान शायना एनसी यांच्याकडून एक चूक घडली. इतर प्रवक्ते फोटो आणि पुस्तकाची पाने फाडत असताना, शायना एनसी यांच्या हातून सर्वांदेखत चुकून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला. फोटो फाडताना चूक लक्षात येताच त्या अर्ध्यावरच थांबल्या आणि त्यांनी जीभ चावली. मात्र, या प्रकारामुळे मोठा गदारोळ उडाला.
या संपूर्ण वादानंतर शायना एनसी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण बाळासाहेबांचा नाही, तर मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला असल्याचा दावा त्यांनी केला. “आम्ही मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडलाय. एकदा नाही तर १० वेळा आम्ही मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडू,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर काही वेळातच शायना एनसी विधानभवनात पोहोचल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधानभवनात बोलावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या प्रकाराबाबतच चर्चा करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आल्याची चर्चा सुरू झाली असून, आता एकनाथ शिंदे त्यांना काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शायना एनसी असू, नाहीतर कोणीही; बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या आरोपावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
- ‘तेव्हाच ही ताकद दाखवली असती तर…’ ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ वादावर दीपाली सय्यद यांचा रुपाली चाकणकरांवर संताप
- हवामान खात्याचा अलर्ट: उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यात गारठा, तर ‘अक्वान’ वादळामुळे विदर्भात पावसाची शक्यता








