प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याबद्दल केलेल्या विधानाप्रकरणी दाखल असलेल्या अवमान याचिकेवर आता ८ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सर्वोच्च न्यायालयाने मनापासून माफी मागण्याचा सल्ला दिला असून, पुढील सुनावणीसाठी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.
आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राऊत यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. राऊत हे प्रतिष्ठित नागरिक आणि उत्कृष्ट संसदपटू आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून अशा विधानांची अपेक्षा नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ‘इतक्या मोठ्या स्वरूपाच्या प्रकरणात केवळ बुद्धीने दिलेली माफी नको, तर ती मनापासून असायला हवी’, अशी स्पष्ट टिप्पणी न्यायालयाने केली.
न्यायालयाने पुढे म्हटले की, “आम्ही वकिली करत असल्यापासून तुमची भाषणे ऐकत आलो आहोत. तुम्ही वरिष्ठ राजकारणी आहात आणि अनेक राजकीय चर्चांमध्ये सहभागी होता, त्यामुळे आता तुम्हीच सांगा काय करायचे ते.” यावेळी राऊत हे ‘सामना’चे संपादक असल्याची बाब त्यांच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिली. तसेच, त्यांनी न्यायालयाची माफी मागितल्याची माहितीही दिली. या सुनावणीत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यातर्फे वकील इंदिरा जयसिंग यांनी बिनशर्त माफी मागितल्याचे सांगितले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या (SCBA) अध्यक्षांनी राऊत यांच्या माफीवर आक्षेप नोंदवला. राऊत यांनी १९ ऑक्टोबर रोजी केलेल्या पोस्टबाबत माफी मागितली असली, तरी त्यानंतरही त्यांनी न्यायालयाविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. अल्बेनियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीला आग लावल्याचा एक फोटो राऊत यांनी पोस्ट केला होता, याकडे लक्ष वेधत अशा पद्धतीची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
आजच्या सुनावणीसाठी राऊत यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश होते, मात्र ते ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहिले होते. सुनावणीअंती न्यायालयाने संजय राऊत आणि निखिल वागळे या दोघांनाही ८ डिसेंबरला न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले. यावेळी राऊत यांच्या वकिलांनी त्यांच्या हृदयाच्या आणि कर्करोगाच्या आजाराचे कारण देत प्रत्यक्ष उपस्थितीतून सूट देण्याची व ऑनलाइन उपस्थित राहू देण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावत उपस्थितीच्या सूचनांचे पालन करण्यास बजावले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मफलर मॅन आणि दादांच्या अपघाताच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘हा विषय अस्वस्थ करणारा…’
- ठाकरे गटात केवळ दोघेच उरणार, संजय राऊत काँग्रेसमध्ये जाणार; नरेश म्हस्केंचा दावा
- २०१८ च्या सँडपेपर प्रकरणावरून उस्मान ख्वाजावरील टीकेनंतर पत्नी रेचेलने दिले टीकाकारांना सडेतोड उत्तर








