मुंबई, 17 नोव्हेंबर: पुण्यात दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमात भाषण करताना शाह यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, कोरोना काळातील आठवणी सांगताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लगावला. यावर पलटवार करताना उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा उल्लेख ‘चकाट्या पिटणारा गृहमंत्री’ असा केला होता. या संपूर्ण घडामोडींवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली असून, आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या ‘मफलर मॅन’च्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी सडकून उत्तर दिले. “ज्यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेशी खोटे बोलून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, मुख्यमंत्रीपदासाठी खोटे बोलून भाजपच्याही पाठीत खंजीर खुपसला, मग खरा मोठा थापाडा कोण?” असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. मोदीजी आणि अमित भाईंवर टीका केल्याने मोठे होता येते, असे त्यांना वाटते. जसे मुघलांच्या घोड्यांना संताजी-धनाजी दिसत होते, तसा यांना आता ‘मोदी फोबिया’ झाला आहे. तुम्ही दाखवता म्हणूनच ते बोलत आहेत, असा टोलाही शिंदे यांनी नाव न घेता लगावला. दुष्काळामुळे शेतकरी संकटात असून राजकारण करण्यासाठी खूप जागा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जा, असा सल्ला देत महाराष्ट्रातील जनतेला त्यांचा खोटारडेपणा आणि थापाडेपणा समजला असल्याचे शिंदे म्हणाले.
दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ‘व्हीएसआर’ (VSR) विमान कंपनीच्या मालकावर गंभीर आरोप केले आहेत. ‘मफलर मॅन’ असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या कंपनीच्या मालकाला वाचवत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांनाही एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. एखाद्यासोबत फोटो असणे किंवा एखाद्याच्या लग्नात जाणे म्हणजे त्यांना पाठिंबा दिला, असे होते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमच्यासोबतही दररोज अनेक जण फोटो काढतात, जे आरोप करत आहेत त्यांचेही किती जणांसोबत फोटो आहेत. ते केवळ पुराव्याशिवाय आरोप करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- जो आपल्याला नडतो, त्याला टप्प्यात आल्यावर डोक्यावर टाकतोच, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचा सूचक इशारा
- रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर ‘मफलरमॅन’ उल्लेख करत गंभीर आरोप, सत्यजीत तांबेंची पोस्टद्वारे एन्ट्री
- राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; आईच्या पुस्तक प्रकाशनात सांगितला केंब्रिजमधील किस्सा








