“मला त्याच्या मर्यादा माहीत आहेत”: आर. अश्विनने सांगितली रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीतील सर्वात मोठी त्रुटी

आर. अश्विनने एका पॉडकास्टवर बोलताना रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीतील मर्यादा आणि त्याची सर्वात मोठी ताकद याविषयी सविस्तर भाष्य करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Published On: 

R Ashwin and Ravindra Jadeja bowling for Indian Cricket Team

प्रतिनिधी, 15 नोव्हेंबर: भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन यांनी त्यांचा एकेकाळचा सहकारी रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आकाश चोप्राच्या ‘बैठ अँड बोल’ (Baith & Bol) या पॉडकास्टवर बोलताना अश्विनने जडेजाच्या गोलंदाजीतील त्रुटी आणि त्याची सर्वात मोठी ताकद यावर सविस्तर भाष्य केले. जडेजाला फलंदाजाला बाद करण्याची कला अवगत नव्हती, असे धक्कादायक विधान अश्विनने यावेळी केले आहे.

भारतीय उपखंडात कसोटी सामने खेळताना अश्विन आणि जडेजा या फिरकी जोडीने धुमाकूळ घातला होता. वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये असलेल्या या जोडीने ५८ कसोटी सामन्यांमध्ये एकत्र खेळताना तब्बल ५८७ बळी मिळवले आहेत. महेंद्रसिंग धोनी आणि त्यानंतर विराट कोहली यांच्या नेतृत्त्वाखाली या जोडीने भारताला अनेक सामने जिंकून दिले. अश्विन आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, तर जडेजाने टी-२० मधून निवृत्ती घेतली असली तरी तो कसोटी संघात नियमितपणे खेळत आहे. वनडे संघात मात्र तो नियमित नाही.

जडेजाच्या मर्यादांविषयी बोलताना अश्विन म्हणाला, “मला त्याच्या मर्यादा चांगल्या प्रकारे माहीत आहेत. फार कमी लोक त्याला त्यातून बाहेर काढू शकले आणि त्यापैकी मी एक होतो. तो नैसर्गिकरित्या अत्यंत प्रतिभावान आहे, हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. एखाद्या दिवशी त्याची कामगिरी चांगली झाली नाही, तर त्याला फक्त ‘तुझे प्रयत्न योग्य आहेत, उद्याचा दिवस चांगला असेल’ असे सांगावे लागते. त्याची ॲक्शन, रिलीज पॉईंट आणि टप्पा इतका अचूक होता की त्याला फार विचार करावा लागत नसे.”

जडेजाच्या गोलंदाजीतील उणिवा सांगताना अश्विनने स्पष्ट केले, “त्याला फलंदाजांना कसे बाद करायचे हे माहीत नव्हते—मी खरोखरच सांगतोय की, त्याला अजिबात माहीत नव्हते. मात्र, फलंदाजाला जखडून ठेवण्याचे त्याचे कसब त्याच्या गोलंदाजीच्या कौशल्याशी जोडलेले होते. तुम्ही त्याला स्वीप करू शकत नाही कारण त्याचा चेंडू खाली राहतो. चेंडूचा वेग चांगला असल्याने तुम्ही पुढे येऊन खेळू शकत नाही. तसेच, चेंडू तसाच राहील की नाही या साशंकतेमुळे फलंदाज निर्धास्तपणे डिफेन्सही करू शकत नाहीत.”

जडेजाच्या या कौशल्याची जाणीव झाल्यानंतर त्याच्याविषयीचा आपला आदर दुणावला असल्याचे अश्विनने नमूद केले. तो म्हणाला, “जेव्हा मला हे समजले, तेव्हा जडेजाविषयीचा माझा आदर दुणावला—तो जे करतो ते सोपे नाही. मी अनेक कुशल फिरकीपटू पाहिले आहेत, पण एकाच वेगाने सातत्याने एकाच टप्प्यावर चेंडू ठेवणे अत्यंत कठीण असते. त्या वेगाने चेंडू फिरवणे सोपे नाही.”

अश्विनने जडेजाच्या सर्वांगीण कौतुकात पुढे म्हटले, “तो नेटमध्ये कधीही प्रयोग करत नाही. पण त्याच्या हातात चेंडू दिला की अचूक टप्पा, उत्तम वेग आणि रोटेशन पाहायला मिळते. तो क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट झेल घेतो, बुलेटसारखा धावतो, रेशमासारखी सहज हालचाल करतो, त्याचे प्रत्येक दुसरे डायरेक्ट हिट अचूक असते. त्याच्याकडे सर्व प्रकारचे फलंदाजीचे शॉट्स, ताकद, कौशल्य, फिरकीपटूंविरुद्धचे डिफेन्स आहे. त्याने वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळण्यात सुधारणा केली असून रणजी करंडक स्पर्धेत त्रिशतकही झळकावले आहे.”

“हे सर्व नैसर्गिक होते! आम्ही त्याच्या जवळ जाण्यासाठी कितीही मेहनत घेतली तरी त्याचे कौशल्य नेहमीच मोठे होते. माझ्याकडे ते कौशल्य असते तर मी जगावर राज्य केले असते, असे मला अनेकदा वाटायचे. पण जे आहे ते आहे. तो इतका कुशल होता की त्याला फार विचार करण्याची गरज नव्हती,” अशी प्रांजळ कबुली अश्विनने दिली.

गेल्या महिन्यात मार्को यान्सेनने पहिल्या स्थानावर झेप घेण्यापूर्वी सलग चार वर्षे जडेजा कसोटी क्रिकेटमधील नंबर वन अष्टपैलू खेळाडू होता. जडेजाने भारतासाठी आतापर्यंत ९१ कसोटी सामने खेळले असून त्यात ३५६ बळी मिळवले आहेत आणि तो कसोटीतील आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक म्हणून कायम आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही