IND vs NZ : धोनीची निवृत्ती ते रोहित-विराटची दाणादाण; मॅट हेन्री ठरला टीम इंडियासाठी पुन्हा ‘काळ’

न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने चौथ्या वनडेत पहिल्याच षटकात भारताच्या तीन प्रमुख फलंदाजांना शून्यावर बाद करत २०१९ विश्वचषकाच्या वाईट आठवणी ताज्या केल्या.

Published On: 

Matt Henry celebrates taking wicket against India

प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात ३३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची अत्यंत लाजिरवाणी सुरुवात झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने ५० षटकांत सर्वबाद ३३३ धावा केल्या. यामध्ये विल यंगच्या १२५, टिम सायफर्टच्या ५८ आणि फिन ऍलनच्या ४१ धावांच्या खेळीमुळे त्यांना या मोठ्या धावसंख्येवर पोहोचता आले.

भारताच्या डावाची सुरुवात होताच पहिल्याच षटकात मॅट हेन्रीने रोहित शर्मा, विराट कोहली आणि कर्णधार श्रेयस अय्यर या प्रमुख फलंदाजांना शून्यावर बाद केले. हेन्रीच्या पहिल्याच चेंडूची उसळी रोहितला समजली नाही आणि चेंडू बॅटची कडा घेऊन स्लिपमध्ये उभ्या असलेल्या फिन ऍलनच्या हातात गेला.

त्यानंतर याच षटकात हेन्रीने विराट कोहलीला सलग चार आऊट स्विंग चेंडू टाकले. पाचवा चेंडू इन स्विंग टाकून त्याने विराटला क्लिन बोल्ड केले; चार चेंडूंचा सामना केलेला विराट शून्यावर माघारी परतला. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेन्रीने टाकलेला इनस्विंग चेंडू कर्णधार श्रेयस अय्यरच्या पॅडवर आदळला.

न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अपील केल्यानंतर अंपायर कुमार धर्मसेना यांनी अय्यरला नाबाद घोषित केले. मात्र, न्यूझीलंडने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यात अय्यर बाद असल्याचे स्पष्ट झाले. पहिल्याच षटकात तीन विकेट्स गेल्याने भारताच्या जुन्या आणि वाईट आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

२०१९ च्या वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही मॅट हेन्रीनेच भारताचे मोठे नुकसान केले होते. त्या सामन्यात त्याने रोहित शर्माला १, केएल राहुलला १ आणि दिनेश कार्तिकला ६ धावांवर बाद केले होते. हेन्रीने १० षटकांत ३७ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्याने त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले होते.

उपांत्य फेरीतील तो पराभव एमएस धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला होता. आता पुन्हा एकदा मॅट हेन्रीच्या या घातक स्पेलमुळे रोहित शर्माचे करिअरही संकटात सापडल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सध्याच्या न्यूझीलंड दौऱ्यात रोहितची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. पहिल्या सामन्यात तो शून्यावर, दुसऱ्या सामन्यात २३ धावांवर बाद झाला. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर चौथ्या सामन्यात तो पुन्हा शून्यावर बाद झाला. यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे सातत्याने चांगली कामगिरी करत असूनही त्यांना संघात संधी मिळत नसल्याने रोहितवरील दबाव वाढला आहे.

पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत वनडे विश्वचषक खेळवला जाणार आहे. तिथल्या खेळपट्ट्याही न्यूझीलंडप्रमाणेच वेग आणि स्विंगला अनुकूल असल्याने रोहित शर्माचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. आता रविवारी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या वनडेत रोहितला मोठी धावसंख्या उभारावीच लागणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही