प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा ‘बॉल टॅम्परिंग’चा (चेंडूशी छेडछाड) वाद चव्हाट्यावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू स्टुअर्ट मॅकगिल याने १९९८ ते २००८ या आपल्या कारकिर्दीत चेंडूची स्थिती बदलण्यासाठी सँडपेपरचा वापर केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.
मॅकगिलचा हा खुलासा उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या वक्तव्यानंतर आला आहे. ख्वाजाने आपल्या आत्मचरित्रात २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील केपटाऊन कसोटीत झालेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणाचा उल्लेख केला होता. सँडपेपर वापरण्याची कल्पना संपूर्ण संघ आणि कोचिंग स्टाफला माहीत होती आणि यात फक्त कॅमेरून बॅनक्रॉफ्ट सामील नव्हता, असा दावा ख्वाजाने केला होता. वॉर्नरनेही या दाव्याला सहमती दर्शवली होती.
माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह ओ’कीफ आणि मोझेस हेन्रिक्स यांच्याशी बोलताना मॅकगिलने सँडपेपर वापरल्याचे मान्य केले. पंचांची नजर चुकवून आपण हे कसे करत होतो, याची पद्धतही त्याने स्पष्ट केली. तो सँडपेपरचा एक छोटा तुकडा कापून टेपच्या साहाय्याने आपल्या अंगठ्याला चिकटवत असे.
चहापानाच्या विश्रांतीनंतर खेळाडू मैदानात परतत असताना पंच चेंडू सीमारेषेजवळ ठेवत असत. या संधीचा फायदा घेत मॅकगिल चेंडू उचलून तो सँडपेपरने घासत असे. त्यानंतर सत्रातील पहिला चेंडू टाकण्यापूर्वी तो सँडपेपर काढून फेकून देत असे. आपण त्यावेळी हे कोणत्याही संघटित फसवणुकीचा भाग म्हणून करत नसल्याचे त्याने म्हटले आहे.
याबाबत बोलताना मॅकगिल म्हणाला, “मी सँडपेपरचा एक छोटा तुकडा कापून माझ्या अंगठ्याला टेपने लावायचो. चेंडूवरील ओरखड्यांशिवाय मी हे केल्याचे कोणालाही माहीत नव्हते. हा कोणत्याही मोठ्या ‘ग्लोबल चीटिंग स्कॅम’चा भाग नव्हता; फक्त काय होते आणि ही युक्ती कामी येते का, हे पाहण्याची मला उत्सुकता होती. आणि हो, ती काम करते.”
सँडपेपर अंगठ्याला लावण्यापुरतेच हे मर्यादित नव्हते. मॅकगिलने आपल्या ट्राउझर्समध्ये (पँटमध्ये) सँडपेपर शिवल्याच्या आणखी एका घटनेचीही आठवण सांगितली. याशिवाय, चेंडूवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी एका संघाने सामना खेळवला जाणारा चेंडू फ्रीझरमध्ये ठेवल्याचा दावाही त्याने केला.
मॅकगिलच्या मते, फायदा मिळवण्यासाठी खेळाडू अनेकदा असे मार्ग शोधत असत आणि त्याच्या खेळण्याच्या काळात अशा पद्धती सामान्य झाल्या होत्या. तो म्हणाला, “कदाचित सुरुवातीच्या काळापासूनच हे (बॉल टॅम्परिंग) होत असावे कारण हा केवळ एक स्पर्धात्मक फायदा मिळवण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असते की प्रत्येकजण हे करत आहे, तेव्हा त्याचे इतके वाईट वाटत नाही. जसे की, मी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत असेल, तर मला माहीत असते की मी जे काही केले आहे, ते त्यांनीही केले आहे; त्यामुळे मला त्याबद्दल वाईट वाटत नाही.”
📌 महत्वाच्या बातम्या
- रहमत शाहची ऐतिहासिक झेप; आयसीसी क्रमवारीत टॉप १० मध्ये येणारा पहिला अफगाण क्रिकेटपटू
- मुंबईत महिला पोलिसाचा ३ वर्षांपासून लैंगिक छळ; हवालदार आनंद नाईकवर गुन्हा दाखल
- कोरोनाचा नवा ‘PJ.2.1’ व्हेरिएंट: संसर्गाचा सर्वाधिक धोका कोणाला?
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








