बीड, 20 ऑक्टोबर: ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडच्या नारायण गडावर आयोजित दसरा मेळाव्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा आणि ‘मास्टरप्लॅन’ स्पष्ट केला. या मेळाव्यात त्यांनी मराठा समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी तीन स्वतंत्र मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत. यंदा या दसरा मेळाव्याचे सलग तिसरे वर्ष असून, राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव येथे एकवटले होते.
विजयादशमीनंतर ज्यांना ‘मराठा सेवक’ म्हणून समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे आणि ज्यांची अद्याप तशी नोंद झालेली नाही, त्यांच्यासाठी पहिला मोबाईल क्रमांक जारी करण्यात येणार आहे. या माध्यमातून घराघरातून मराठा सेवक तयार व्हावेत, असे आवाहन त्यांनी केले. दुसरा क्रमांक कुणबी नोंदींच्या समस्यांसाठी असणार आहे. ज्यांच्या नोंदी सापडूनही प्रमाणपत्र, व्हॅलिडिटी किंवा एसईबीसी (SEBC) आरक्षण दिले जात नाही, तसेच अधिकारी जाणूनबुजून त्रास देत असतील, त्यांच्या तक्रारी या क्रमांकावर मांडता येतील. तर तिसरा क्रमांक आरक्षणाव्यतिरिक्त समाजाच्या इतर अडचणींसाठी असून, त्यावर फोन न करता केवळ संदेश (मॅसेज) पाठवण्याच्या सूचना जरांगे (Manoj Jarange )यांनी दिल्या आहेत.
सभेला उसळलेल्या भव्य गर्दीचा संदर्भ देत जरांगे पाटील म्हणाले की, आपण कोणाच्या जिवावर नसून स्वतःच्या जिवावर जगत असल्याचे यातून सिद्ध होते. गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाज उन्हातान्हात संघर्ष करत आहे. पवित्र नारायण गडावरून त्यांनी ठणकावून सांगितले की, समाजासाठी आजवर एकही चुकीचे पाऊल टाकले नसल्यानेच आपण अनेकांच्या डोळ्यात खुपतो आहोत. इथून पुढे जो नेता समाजाच्या विरोधात जाईल, त्याला २०२९ च्या निवडणुकीत घरी बसवण्याचा थेट इशारा त्यांनी दिला.
समाजाचे दुःख ऐकायला शिका असे सांगतानाच जरांगे यांनी नेत्यांवरील आंधळे प्रेम बंद करण्याचे सुनावले. पक्ष आणि नेत्यांना मोठे करण्यासाठी लोक जीव देतात आणि एखाद्या नेत्यावर संकट आल्यावर समाज त्याला पाठीशी घालतो. मात्र, याचा परिणाम म्हणून कुणबी नोंदी मिळूनही अधिकाऱ्यांकडून अर्ज नाकारले जातात. ‘आता कोणता अधिकारी प्रमाणपत्र देत नाही, ते बघतोच,’ असा दमही त्यांनी भरला. समाजातील ८० टक्के लोक शेतकरी आहेत. घरात एखादा नोकरीवर असता तर कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला असता, मात्र तशी स्थिती नाही. शेतीत पीक आले नाही तर शेतकरी जगूच शकत नाही, त्यामुळे समाजाला भानावर येण्याची आणि नेत्यांचा उदो उदो थांबवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
या दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसमोर शेतकऱ्यांच्या हिताच्या पाच प्रमुख मागण्या ठेवल्या. यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, संपूर्ण कर्जमाफी मिळावी, पीक विम्याचे सर्व पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, रखडलेले अनुदान तत्काळ द्यावे आणि गावागावांत चारा छावण्या उभ्या कराव्यात, या मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान, या मेळाव्याला शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुखांनी विरोध दर्शवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात न बोलण्याचा इशारा दिला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोकुळ निवडणूक २०२६: सतेज पाटलांनी उलगडली महायुतीच्या १३-१२ पराभवाची ‘A टू Z’ कारणे
- उत्तराखंडविरुद्ध साई किशोरची ऐतिहासिक हॅट्ट्रिक; १० बळी घेत उडवला धुव्वा
- कसोटीतील सर्वोत्तम ५ फलंदाजांच्या यादीतून चेतेश्वर पुजाराने स्वतःला वगळले; ‘या’ दिग्गजांना दिले स्थान
Quick Answers
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी तीन स्वतंत्र मोबाईल संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देणे, संपूर्ण कर्जमाफी करणे, पीक विम्याचे पैसे थेट खात्यात जमा करणे, रखडलेले अनुदान तत्काळ देणे आणि गावागावांत चारा छावण्या उभारणे या पाच मागण्या त्यांनी ठेवल्या आहेत.
इथून पुढे जो नेता मराठा समाजाच्या विरोधात जाईल, त्याला २०२९ च्या निवडणुकीत घरी बसवण्याचा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








