Share

निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेवरून सुप्रिया सुळेंचा संताप; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका करत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केली.

Published On: 

Supriya Sule

ठाणे, 11 ऑक्टोबर: निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभारावरून इंडिया आघाडीने केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. गुरुवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीचे खासदार सध्या दिल्लीत आंदोलन करत असून या आंदोलनाची धार कमी झालेली नाही, असे सुळे यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व खासदारांनी दिल्लीत न बसता कामाची विभागणी केली आहे. त्यानुसार समाजवादी पक्षाचे खासदार उत्तर प्रदेशात आंदोलन करत असून आपण महाराष्ट्रात जनतेचे प्रश्न मांडत असल्याचे त्या म्हणाल्या.

निवडणुकीतील गैरप्रकार हा आता केवळ राजकीय मुद्दा उरलेला नाही, तर सर्वोच्च न्यायालयानेही यावर अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत, याकडे सुळे यांनी लक्ष वेधले. निवडणूक आयोगाने संबंधित घटकांना माहिती न देता एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करत, हा प्रकार नियम आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा नसल्याचे त्यांनी सुनावले.

इंडिया आघाडीने ईव्हीएम हटवण्याची आणि निवडणूक प्रक्रियेत मूलभूत बदल करण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. मात्र, निवडणूक आयोगाची भेट घेण्यापासून विरोधकांना आणि गांधी कुटुंबीयांना रोखले जात असल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “आम्ही संविधानाच्या चौकटीत शांततेने पदयात्रा काढली, मात्र पोलिसांनी आम्हाला अडवले. आम्हाला शंभर मीटर चालू दिले असते तर आम्ही आमचे प्रश्न मांडले असते. जनतेने आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी निवडून दिले आहे. जर आम्हाला प्रश्नच विचारू दिले जाणार नसतील, तर मतदानाचा उपयोग काय?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, कल्याण-मुरबाड मार्गावरील कांबा येथील मोनालिसा हॉलमध्ये आयोजित महिला मेळाव्यात बोलताना सुळे (Supriya Sule) यांनी महागाई, बेरोजगारी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. महिला आरक्षणाची अद्याप अंमलबजावणी का झाली नाही, असा जाब विचारत २०२९ पर्यंत महिलांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांवरही त्यांनी शंका उपस्थित करत लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी महिलांनी जागरूक राहावे, असे आवाहन केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही