Chirag Paswan: दिल्लीच्या जंतरमंतरवर झालेल्या एका मारहाणीच्या प्रकरणाने आता थेट राजकीय वळण घेतलं आहे. एका पॉडकास्टवर हाणामारीची बढाई मारणारा कथित हिंदुत्ववादी इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाज याच्यावर आता केंद्रीय मंत्री चिराग पासवान चांगलेच भडकले आहेत. भारद्वाजने या प्रकरणात स्वतःला वाचवण्यासाठी पासवान यांच्या नावाचा गैरवापर केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच संतप्त झालेल्या पासवान यांनी केवळ शब्दांत नाराजी व्यक्त केली नाही, तर थेट पोलिसांत धाव घेत भारद्वाजविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
नेमकं काय घडलंय?
काही दिवसांपूर्वी जंतरमंतरवर एका आंदोलनादरम्यान विद्यार्थिनी निशू आझाद हिचे वडील संजय कुमार यांना जबर मारहाण झाली होती. या मारहाणीचा आरोप स्वतंत्र भारद्वाज याच्यावर आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे, अलीकडेच एका व्हायरल पॉडकास्टमध्ये भारद्वाजने उघडपणे या हल्ल्याची कबुली दिली. ‘मी त्या व्यक्तीचं डोकं फोडलं, तरीही मला जेल झाली नाही’. यामागचं कारण सांगताना त्याने भाजप नेते कपिल मिश्रा आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे आपले ‘मोठे भाऊ’ असल्याचा दावा केला. याच दाव्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे.
Chirag Paswan files police complaint against Swatantra Bhardwaj
‘अशी गुंडगिरी खपवून घेणार नाही’; चिराग पासवान यांचा कडक इशारा
या व्हायरल दाव्यानंतर चिराग पासवान यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “एखादी व्यक्ती दुसऱ्याला जीवघेणी मारहाण केल्याची उघडपणे कबुली देते आणि तरीही तिच्यावर कारवाई होत नसेल, तर हे देशासमोर अत्यंत चुकीचं उदाहरण ठरेल,” असं पासवान यांनी सांगितलं. सार्वजनिक जीवनात अनेक लोक नेत्यांना भेटतात, पण याचा अर्थ त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत असा अजिबात होत नाही. त्यामुळे माझ्या नावाचा झालेला हा गैरवापर अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पासवान यांनी या प्रकरणातून स्वतःला पूर्णपणे वेगळं केलं असून, पीडित निशू आझाद आणि तिच्या कुटुंबाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. लोक जनशक्ती पक्षाने दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली असून, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे, या वाढत्या दबावानंतर दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाज याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलं असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘गार्डन से रिपोर्टिंग लाईव्ह…’; रोहित शर्माची टीव्हीवर धमाकेदार एन्ट्री, तर दुसरीकडे BCCI नेही केली मोठी घोषणा
- व्हॉट्सॲपने आणलं नवं भन्नाट फीचर; चॅटचा संपूर्ण लुक बदलून टाकणारी ही अपडेट पाहिलीत का?
- भारतीय ऑलिम्पिक संघटनेने BCCI ला फटकारले; क्रिकेटच्या VIP ट्रिटमेंटला एशियन गेम्समध्ये ब्रेक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











