Share

दिशा सालियन प्रकरण: ‘मला व्हिलन बनवणं थांबवा’; CBI चौकशीच्या आदेशानंतर सूरज पांचोलीचा मोठा गौप्यस्फोट

दिशा सालियन प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश मिळताच सूरज पांचोलीने आपल्याला जाणीवपूर्वक सॉफ्ट टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला आहे.

Published On: 

Sooraj Pancholi speaks on Disha Salian CBI probe by Bombay High Court

मुंबई– दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला आता तब्बल सहा वर्षांनंतर एक नवं आणि अतिशय धक्कादायक वळण लागलं आहे. बॉम्बे हायकोर्टाने २ सप्टेंबर २०२६ रोजी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे अधिकृत आदेश दिले आहेत. पण या सगळ्या घडामोडीत बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोली याने मौन सोडत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘मी दिशाला कधी भेटलोच नाही, तरीही मला वारंवार सॉफ्ट टार्गेट बनवलं जातंय,’ अशी संतप्त प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने सीबीआयला एफआयआर (FIR) नोंदवून योग्य त्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत भक्कम पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत कुणालाही आरोपी मानलं जाऊ नये, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मात्र, सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘सीबीआयने सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून एफआयआर दाखल करावा. ज्यांच्या विरोधात पुरावे मिळतील, तेच आरोपी असतील. पण एफआयआरमध्ये त्या सर्व नावांचा समावेश असेल, ज्यांच्यावर सालियन कुटुंबाला संशय आहे.’ याच यादीमध्ये सूरज पांचोलीचेही नाव असल्याचं समोर आलं आहे.

Disha Salian CBI Probe Sooraj Pancholi Reaction

दिशा सालियन प्रकरण आणि सीबीआय चौकशी

या संपूर्ण वादावर सूरज पांचोलीने आपली बाजू मांडली आहे. ‘मी दिशा सालियनला माझ्या आयुष्यात कधीही भेटलेलो नाही. आमचं फोनवरही कधी बोलणं झालं नाही किंवा मी तिच्या कोणत्याही पार्टीला गेलो नाही,’ असं त्याने स्पष्ट केलं. तो पुढे म्हणाला की, ‘माझ्या कुटुंबाची इच्छा आहे की मी या सगळ्यातून दूर राहावं आणि माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करावं. पण आता मला सॉफ्ट टार्गेट व्हायचं नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय मला या प्रकरणात ओढलं जाणं चुकीचं आहे आणि तोच मानसिक त्रास मला पुन्हा सहन करायचा नाही’.

विशेष म्हणजे, २०२१ मध्ये सीबीआय आणि मालवणी पोलिसांना आपण स्वतःहून जबाब दिल्याची माहिती सूरजने दिली. ‘दिशाच्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे, ही माझीही प्रामाणिक इच्छा आहे. जर माझ्याविरुद्ध काही पुरावा असेल, तर मला खुशाल तुरुंगात टाका. पण जर तसं नसेल, तर विनाकारण मला यात गोवणं थांबवा,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. ‘नेहमी मलाच व्हिलन म्हणून का उभं केलं जातं?’ असा सवालही त्याने उपस्थित केला.

दुसरीकडे, सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्यांवर सूरजने आता कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. ‘माझी बदनामी करणाऱ्या प्रत्येक बेजबाबदार वक्तव्याविरोधात मी आता थेट हायकोर्टात खटला दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहे,’ असं त्याने ठणकावून सांगितलं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आता सीबीआय चौकशी सुरू होणार असली तरी, सूरज पांचोलीने खोट्या आरोपांविरोधात आरपारची लढाई लढण्याची भूमिका घेतली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही