Rain Alert in Maharashtra : देशाच्या उत्तरेकडील भागांसह महाराष्ट्र आणि दक्षिण राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण १९ राज्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. या काळात अनेक राज्यांमध्ये ताशी ६० ते ६५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून, उत्तर भारतातील काही भागांमधील प्रशासनाने २०,००० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, देशभरात मान्सून सक्रिय झाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
‘एल निनो’च्या (El Niño) प्रभावामुळे देशभरातील वातावरणात चढ-उतार होत आहेत. ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी उघडीप दिली होती. अनेक भागांत अजिबात पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मराठवाड्यासह अनेक भागांवर दुष्काळाचे सावट होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत आकाश ढगाळले असून मुंबई आणि पुण्यासारख्या जिल्ह्यांत हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.
Heavy rain alert in Maharashtra
मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी, विदर्भासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’
राज्यातील अकरा जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इशारानुसार, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस पडू शकतो, तसेच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
ऊन-पावसाचा खेळ
राज्यातील अनेक भागांत ऊन आणि पावसाचा लपंडाव पाहायला मिळू शकतो. काही भागांत पावसाचा जोर कमी असेल, तर काही ठिकाणी पाऊस अधूनमधून पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पाऊस पडेल. आगामी काही दिवसांत राज्यातील काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 4 सप्टेंबरच्या रात्री पेमेंट करता येणार नाही
- बिडकीन पोलिसांचा पुन्हा नवा प्रताप! चक्क पत्रकारालाच मागितला हप्ता; हवालदार ACB च्या जाळ्यात
- मराठवाड्यात राजकीय रणधुमाळी; ठाकरे पिता-पुत्रांचे दौरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











