Share

बिडकीन पोलिसांचा पुन्हा नवा प्रताप! चक्क पत्रकारालाच मागितला हप्ता; हवालदार ACB च्या जाळ्यात

बिडकीन हद्दीत टिप्पर चालवण्यासाठी पत्रकारालाच हप्ता मागणारा हवालदार भारत चव्हाण जालना एसीबीच्या जाळ्यात अडकला. बिडकीन पोलिसांच्या मनमानी कारभाराची पुन्हा चर्चा.

Published On: 

Bidkin Police ACB Bribe Trap caught constable Bharat Chavan by Jalna ACB

बिडकीन – रक्षकच भक्षक झाले तर दाद कुणाकडे मागायची? छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन पोलीस ठाण्यात सध्या असंच काहीसं सुरू आहे. कधी बेकायदेशीर ई-चलन, तर कधी थेट हप्ता वसुली. आता एका हवालदाराने चक्क एका पत्रकारालाच हप्ता मागण्याची हिंमत केली. पण हाच अतिआत्मविश्वास अंगलट आला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात हा पठ्ठ्या रंगेहाथ अडकला.

भारत लालचंद चव्हाण (वय ४६, बक्कल क्रमांक ५२२) बिडकीन पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत. या महाशयांना पैठण एमआयडीसीकडे जाणाऱ्या एका टिप्परकडून १००० रुपयांची लाच घेताना बुधवारी (२ सप्टेंबर) भरदिवसा रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Bidkin ACB Trap : पत्रकार असल्याचं समजताच दिली ‘डिस्काउंट’ ऑफर!

तक्रारदार हे ४० वर्षीय बिल्डिंग मटेरियल सप्लायर तसेच पत्रकारितेतही सक्रिय आहेत. त्यांच्याकडे दोन टिप्पर असून ते खडी आणि विटाची वाहतूक करतात. मंगळवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी त्यांच्या चालकाला शेकटा फाटा (बिडकीन पोलिस हद्द) येथे पोलिसांनी अडवले. हवालदार चव्हाणने (Bharat Chavan) थेट मालकाशी म्हणजे तक्रारदाराशी फोनवर संपर्क साधला. “तुझी गाडी बऱ्याच दिवसांपासून चालू आहे. बिडकीन हद्दीत गाडी चालवायची असेल तर मला हप्ता द्यावा लागेल, नाहीतर गाडी चालू देणार नाही,” अशी उघड धमकीच त्याने दिली.

या प्रकारामुळे संतापलेल्या तक्रारदाराने थेट जालना एसीबीचे कार्यालय गाठत, तिथे लेखी तक्रार दिली. त्याच दिवशी संध्याकाळी ५ च्या सुमारास एसीबीने पंचांसमक्ष या मागणीची पडताळणी केली. तक्रारदार हे पत्रकार असल्याचे समजल्यावर हवालदार चव्हाणने थोडी नरमाईची भूमिका घेतली. दोन गाड्यांपैकी एका गाडीला ‘सूट’ देत, केवळ एकाच गाडीचा १००० रुपये महिना हप्ता देण्याचे त्याने मान्य केले.

ठरल्याप्रमाणे बुधवारी दुपारी पैठण-बिडकीन रोडवरील मुधलवाडी शिवारात स्वराज ऑटोमोबाईलसमोर एसीबीने सापळा लावला. पंचांसमक्ष १००० रुपयांची लाच घेताना हवालदार चव्हाणला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. सध्या त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा पथकात गजानन घायवट, मनोहर भुतेकर, गणेश चेके आणि गजानन कांबळे यांचा समावेश होता. ही कारवाई जालना एसीबीचे उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या पथकाने केली असून, पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि अपर अधीक्षक शशिकांत शिंगारे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

बिडकीन पोलिसांची जुनीच खोड?

याआधीही, बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक कारवाईच्या नावाखाली मोठा सावळागोंधळ उघडकीस आला होता. रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी कडक कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, बिडकीनमध्ये पोलिसांनी शासनाच्या अधिकृत ‘ई-चलन मशीन’ऐवजी स्वतःच्या खासगी मोबाईलवरून नियमबाह्य चलन फाडण्याचा प्रकार केला होता. पत्रकाराची गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात उभी असताना ‘चित्तेगाव’चे लोकेशन दाखवून भारत चव्हाण यांनी चलन पाठवले होते.

वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसवून मनमानी करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी त्यावेळी झाली होती. तो संतापजनक प्रकार ताजा असतानाच, आता थेट हवालदारच लाच घेताना पकडल्याने बिडकीन पोलिसांचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही